केंद्राच्या फेरविचार याचिकेत राज्याने सहभागी व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:15 AM2021-05-18T04:15:12+5:302021-05-18T04:15:12+5:30
चांदवड : मराठा आरक्षणाबाबत केंद्राच्या फेरविचार याचिकेत राज्याने सहभागी व्हावे, अशी मागणी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी ...
चांदवड : मराठा आरक्षणाबाबत केंद्राच्या फेरविचार याचिकेत राज्याने सहभागी व्हावे, अशी मागणी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणासंदर्भातील निकालानंतर महाविकास आघाडी सरकारने आपला उरलासुरला आत्मविश्वास ही गमावला असून आता केवळ नाचक्की टाळण्याची चालढकल सुरू झाली आहे. आता केंद्राच्या फेरविचार याचिकेनंतर सुटका झाल्याचा सूर लावणारे ठाकरे सरकार मराठा आरक्षणासंबंधी खरोखरच गंभीर आहे का ही शंका बळावली आहे. दीर्घकाळ टांगणीवर राहिलेल्या या सामाजिक महत्त्वात्वाच्या मुद्द्याचे गांभीर्य ओळखून चालढकल करण्यापेक्षा राज्य सरकारने केंद्राच्या फेरविचार याचिकेत सहभागी व्हावे, अशी मागणी भाजपाचे आमदार राहुल आहेर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. राज्य सरकारने सातत्याने घेतलेल्या कचखाऊ धोरणामुळेच हा प्रश्न लोंबकळत राहिला व चिघळत गेला असून, आता केंद्रामुळे तो मार्गी लागण्याची चिन्हे दिसत असताना केवळ राजकारणासाठी खोडा न घालता, आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवली पाहिजे. या प्रश्नाची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतच्या काळात मराठा समाज सवलतींपासून वंचित राहू नये याकरिता फडणवीस सरकारने लागू केलेल्या सवलती त्वरित अमलात आणाव्यात, असे डॉ. राहुल आहेर म्हणाले.