राज्य परिवहन महामंडळाच्या पदोन्नती वादात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 11:56 PM2019-06-25T23:56:13+5:302019-06-26T00:25:13+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातील कारभाराबाबतच्या अनेक तक्रारी विधानसभेपर्यंत पोहोचल्यानंतर अनेकांची चौकशी होण्याची शक्यता असतानाच कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची बक्षिसी मिळाल्याने महामंडळाकडून अंतर्गत कारभारावर पडदा टाकला .....
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातील कारभाराबाबतच्या अनेक तक्रारी विधानसभेपर्यंत पोहोचल्यानंतर अनेकांची चौकशी होण्याची शक्यता असतानाच कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची बक्षिसी मिळाल्याने महामंडळाकडून अंतर्गत कारभारावर पडदा टाकला जात असल्याची जोरदार चर्चा आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी या बदल्यांवर आक्षेप घेतले असल्याचे वृत्त असून, स्थानिक पातळीवरील अधिकाºयांकडून दाद मिळत नसल्याने महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयात थेट काही कर्मचारी पोहोचले असल्याचे समजते.
राज्य परिवहन महामंडळाने प्रमुख कारागीर, कारागीर (क), सहायक कारागीर या प्रवर्गातील सुमारे दीडशेपेक्षा अधिक कर्मचाºयांची पदोन्नतीवर बदली केली असून, खाते अंतर्गत घेण्यात आलेल्या बढती परीक्षेतील आधारावर त्यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे. डिसेंबर २०१८ मध्ये सदर खाते अंतर्गत परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रमुख कारागीर म्हणून पदोन्नती मिळालेली आहे.
तांत्रिकदृष्ट्या अशाप्रकारच्या पदोन्नतीत कोणताही आक्षेप नसला तरी बढती देण्यात आलेल्या असंख्य कर्मचाºयांच्या खात अंतर्गत चौकशा आणि काहींवर गंभीर स्वरूपाचे आरोप असल्याने त्याबाबतची कार्यवाही होण्यापूर्वीच बदली झाल्याने चौकशी प्रकरणे बाजूला पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
नाशिक विभागातील डेपो क्रमांक १ मधून बढती मिळालेल्या काही कामगारांवर चुकीच्या निर्णयामुळे कामगारांच्या जिवाचा प्रश्न निर्माण झाल्याने निलंबनाची टांगती तलवार असताना पदोन्नतीमुळे संपूर्ण प्रकरण बाजूला पडण्याची शक्यता आहे. अशाच प्रकारे कामकाजातील अनियमितता आणि गैरहजर राहण्याच्या तक्रारींमुळेदेखील काही अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता असताना त्यांनाच बढती देण्यात आल्यामुळे अन्य कर्मचाºयांमध्ये तीव्र नाराजी आहे.
एसटी महामंडळात अधिकाºयांविरुद्धच मोठ्या प्रमाणात तक्रारी असतानाच आणि थेट राज्यातील असंख्य आमदारांनीच अनेक प्रकारचे संशय व्यक्तकेलेले असताना राज्यभर कर्मचाºयांना पदोन्नती देण्यात आल्यामुळे या प्रकारामुळे अधिकारी संगनमताने कर्मचाºयांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. डेपो पातळीवर आणि विभागीय कार्यालयातही अनेक कर्मचाºयांविषयी गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असतानाही अशा कर्मचाºयांना त्यावेळी वाचविण्यात आल्यामुळे त्यांना आपल्यावरील आरोप म्हणजे पदोन्नतीची बक्षिसी वाटू लागली असून, तशी वल्गना ते करू लागले आहेत.
डेपोतील कारभार रामभरोसे
नाशिक डेपो क्रमांक १ मधील कारभार अनियंत्रित झाल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या असतानाही या डेपोकडे लक्ष देणारा सक्षम अधिकारी नसल्यामुळे येथे सारे काही रामभरोसे सुरू असल्याची चर्चा आहे. कर्मचाºयांचे अंतर्गत वाद, बाह्यव्यक्तींचा हस्तक्षेप, असभ्य वर्तन, खासगी ट्रॅव्हल्सचा व्यवसाय अशा अनेकविध कारणांमुळे डेपोतील कारभार चर्चेत आहे. मात्र या प्रकरणांची गांभीर्याने तक्रारच होऊ शकलेली नाही.