रस्त्यावरील फुटपाथवर विक्रेत्यांचेच राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:16 AM2020-12-06T04:16:00+5:302020-12-06T04:16:00+5:30
नाशिक : शहरात गर्दी असलेल्या मार्गांवर पादचाऱ्यांना चालता यावे यासाठी महापालिकेने फुटपाथ तयार केले असले तरी बहुतांशी ...
नाशिक : शहरात गर्दी असलेल्या मार्गांवर पादचाऱ्यांना चालता यावे यासाठी महापालिकेने फुटपाथ तयार केले असले तरी बहुतांशी फुटपाथवर विक्रेत्यांचे राज्य असल्याने पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे अशा विक्रेत्यांवर महापालिकेकडून अपवादानेच कारवाई होत असल्याने संबंधित विक्रेत्यांचे फावले आहे.
कोरोनासाठी केलेले लाॅकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर आता बाजारपेठा गजबजल्या आहेत. परंतु आता रस्त्यावरील विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पुन्हा फोफावलेल्या अतिक्रमणांमुळे स्थिती जैसे थे निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे महापालिकेने फेरीवाला झोन तयार केले असले तरी ते पन्नास टक्केही अंमलात आलेले नाही आणि दुसरीकडे नवीन फेरीवाले तसेच पथारीवाल्यांची अतिक्रमणे वाढत आहेत. शिवाजी रोड, मेनरोड ते गंगापूर रोड तसेच उपनगरांमध्येही फुटपाथ हरवल्याची स्थिती आहे. रस्त्यावर चालणाऱ्यांचा हक्क हिरावल्याचे यानिमित्ताने दिसत आहे. त्यामुळे अतिक्रमणमुक्त फुटपाथ संकल्पना राबवण्याची गरज आहे.
--------------
कोरोना संसर्गाचा धोका
रस्त्यावर विक्री करणाऱ्यांनादेखील महापालिकेने मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर या नियमावलीची सक्ती केली आहे. मात्र, त्यानंतही असे कोणतेही नियम पाळले जात नाही. त्यामुळे केारोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे.
------------------
स्वस्त मिळते म्हणून ग्राहकांचीही गर्दी
रास्ते का माल सस्ते मे अशी अवस्था असल्याने दुकानापेक्षा रस्त्यावर अतिक्रमण करून विक्री करणाऱ्यांकडेही गर्दी असते त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांचे फावते. गर्दीच्या ठिकाणी व्यवसाय चालत असल्याने मोकळे रस्ते सोडून पादचारी मार्गावरच विक्रेते ठाण मांडून बसतात.