मुख्यमंत्र्यांपुढे जिल्हा बॅँकेच्या आर्थिक स्थितीचे कथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 01:02 AM2018-11-17T01:02:57+5:302018-11-17T01:03:11+5:30
आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक परिस्थितीबाबत अध्यक्ष केदा अहेर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन लक्ष वेधले. बॅँकेला सहकार्य करण्याच्या दृष्टीने फडणवीस यांनी मुंबईत विधानसभा अधिवेशनाच्या दरम्यान जिल्हा बँकेची आढावा बैठक बोलाविण्याची तयारी दर्शविली आहे.
नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक परिस्थितीबाबत अध्यक्ष केदा अहेर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन लक्ष वेधले. बॅँकेला सहकार्य करण्याच्या दृष्टीने फडणवीस यांनी मुंबईत विधानसभा अधिवेशनाच्या दरम्यान जिल्हा बँकेची आढावा बैठक बोलाविण्याची तयारी दर्शविली आहे.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीत अध्यक्ष अहेर यांनी बँकेच्या अडचणी मांडल्या. नोटाबंदी व कर्ज वसुली न झाल्याने जिल्हा बँकअडचणीत सापडली. बॅँकेच्या थकीत कर्जवसुली मोहिमेस चांगले यश मिळत असतानाच दुष्काळ जाहीर झाला. यामुळे दुष्काळी तालुक्यातील वसुली पुन्हा थांबविण्यात आली आहे. बँकेकडे पुरेसा निधी नसल्याकारणाने शेतकऱ्यांची मागणी असतानाही खरीप हंगामात कमी कर्जपुरवठा करावा लागला. रब्बी हंगामातही हीच अवस्था आहे. शेतकºयांना कर्जपुरवठा व्हावा यासाठी एक हजार कोटींची मदत मिळावी, अशी मागणीसह प्रस्ताव राज्य सहकारी बँकेकडे पाठविण्यात आला. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे अध्यक्ष अहेर यांनी फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले. बंद पडलेल्या साखर कारखान्यांचा बसलेला फटकाही यावेळी सांगण्यात आला. नियमित कर्जपुरवठा केल्यास, परतफेड वेळात करणारे शेतकरी आहे. त्यासाठी बँकेला निधीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यावर, मुख्यमंत्री फडणवीस यांनी बँकेला निधी देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. त्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह बँकेच्या अधिकाºयांसमवेत आढावा बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले. त्यासाठी १९ पासून सुरू होणाºया हिवाळी अधिवेशन दरम्यान बँकेची आढावा बैठक घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याचे अध्यक्ष अहेर यांनी सांगितले.