निफाड तालुका मंगल कार्यालय, लॉन्स असोसिएशनचे तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 07:23 PM2021-03-23T19:23:11+5:302021-03-23T19:25:31+5:30
निफाड : ५० लोक किंवा अनुज्ञेय संख्येच्या उपस्थितीत अटी-शर्तीवर लॉन्स, मंगल कार्यालय सुरू करण्यास राज्य शासनाने तातडीने परवानगी द्यावी, अशा आशयाचे निवेदन मंगळवारी निफाड तालुका मंगल कार्यालय व लॉन्स असोसिएशनच्या वतीने निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांना देण्यात आले.
निफाड : ५० लोक किंवा अनुज्ञेय संख्येच्या उपस्थितीत अटी-शर्तीवर लॉन्स, मंगल कार्यालय सुरू करण्यास राज्य शासनाने तातडीने परवानगी द्यावी, अशा आशयाचे निवेदन मंगळवारी निफाड तालुका मंगल कार्यालय व लॉन्स असोसिएशनच्या वतीने निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांना देण्यात आले.
यावेळी नगरसेवक अनिल कुंदे, दिलीप कापसे, निफाड तालुका मंगल कार्यालय व लॉन्स असोसिएशनचे अध्यक्ष तानाजी टर्ले, उपाध्यक्ष पांडुरंग आव्हाड, सरचिटणीस अनिल कहाणे, खजिनदार मनोहर मोगल, कार्याध्यक्ष नंदू कापसे, सल्लागार जयदत्त व्यवहारे, नरेंद्र कायस्थ, सुनील वडघुले, सदस्य गणेश काळे, राकेश चव्हाण, रवींद्र खालकर, शांताराम शिंदे, संदीप माळोदे, सागर सानप आदी उपस्थित होते.
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी शासनाच्या वतीने उपाययोजना अवलंबल्या जात आहेत. त्यात १५ मार्चनंतर राज्यातील लॉन्स, मंगल कार्यालयात विवाह सोहळे आयोजित करण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे व ५० लोकांच्या उपस्थितीत घरी विवाह समारंभ आयोजित करण्यास अटी-शर्तींवर परवानगी देण्यात आली आहे.
या नियमामुळे तालुक्यातील लॉन्स, मंगल कार्यालय पूर्णपणे बंद असून, सर्व काम ठप्प झाले आहे. मागील वर्षी लॉन्स, मंगल कार्यालय पूर्णपणे बंद असल्याने आमचे आर्थिक उत्पन्न बुडाले. त्यामुळे आमचा आर्थिक कणा पूर्णपणे मोडला गेला आहे. यावर्षीही १५ मार्चनंतर लॉन्स, मंगल कार्यालय येथे विवाह सोहळे आयोजित करण्यास बंदी घातल्याने आमच्या संकटात आणखी भर पडली आहे. त्यामुळे लॉन्स, मंगल कार्यालयाची भरावी लागणारी सरकारी पट्टी, कर, वीज बिल माफ करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
शिवाय ५० लोक किंवा अनुज्ञेय संख्येच्या उपस्थितीत अटी-शर्तीवर विवाह सोहळे लॉन्स, मंगल कार्यालय येथे करण्यास परवानगी द्यावी, हे विवाह सोहळे संपन्न करताना कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करू, असे निवेदनात म्हटले आहे.