झिरवाळ भगरेंचा प्रचार करतील असे वाटत नाही ! छगन भुजबळ यांचे वक्तव्य
By धनंजय रिसोडकर | Published: May 10, 2024 04:46 PM2024-05-10T16:46:50+5:302024-05-10T16:47:24+5:30
भुजबळ यांनी शुक्रवारी (दि. १०) भुजबळ फार्मवर पत्रकारांशी संवाद साधला.
धनंजय रिसोडकर, नाशिक : दिंडोरीतील महाआघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांचा प्रचार नरहरी झिरवाळ करतील, असे वाटत नाही. त्यातही भगरे आणि झिरवाळ दोघेही दिंडोरीतील आहेत. भगरे हे पूर्वी आमच्यासोबत होते, त्यामुळे त्यांच्या भेटीतून वेगळा अर्थ काढू नये. माझ्याकडेही काही लोक येतात, शांतिगिरी महाराजही मला भेटून गेल्याचे सांगत छगन भुजबळ यांनी झिरवाळ यांच्या भगरे भेटीबाबत कोणतेही थेट विधान करणे टाळले.
भुजबळ यांनी शुक्रवारी (दि. १०) भुजबळ फार्मवर पत्रकारांशी संवाद साधला. प्रत्येक ठिकाणी जाणे हे उमेदवाराचे कामच असते. त्यानुसार सर्वच उमेदवार सर्वत्र जातात, असेही भुजबळ यांनी नमूद केले.
यावेळी बोलताना भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विधानावरही भाष्य केले. आता पक्ष साफ झाला, म्हणता तर मग अधिक कशाला बोलता ? तिकडच्यांनी तिकडे काम करावे, इकडचे इकडे काम करतील. मार्ग वेगवेगळे झाले असल्याने प्रत्येकाने आपापले कार्य करावे, दु;ख व्यक्त करायचे कारणच काय? असा सवालदेखील भुजबळ यांनी उपस्थित केला, तर मोदी यांनी ऑफर ठाकरे आणि पवारसाहेबांना दिली असल्याने त्याबाबत तेच बोलू शकतील, मी काय बोलावे? असे म्हणून भाष्य करणे टाळले.
धार्मिक कार्यक्रमामुळे एकत्र आल्याने चर्चा-
दिंडोरी तालुक्यातील तिसगाव येथे मारुती मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने अक्षय तृतीयेप्रसंगी विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ, तसेच दिंडोरी लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार भास्कर भगरे आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते श्रीराम शेटे हे एकत्र आले होते. त्यानंतर झिरवाळ आणि भगरे यांचे एकत्रित फोटो व्हायरल झाल्याने बरीच चर्चा सुरू झाली होती.