इगतपुरीत जुन्या पेन्शन योजनेसाठी तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 05:40 PM2021-01-19T17:40:38+5:302021-01-19T17:41:59+5:30
वैतरणानगर : राज्यात दि.१ नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाश्वत अशी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या इगतपुरी शाखेच्या वतीने तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. सदर निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याची विनंती कासुळे यांना करण्यात आली आहे.
कित्येक महिन्यांपासून शिक्षण क्षेत्रासह विविध विभागांतील कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या असणाऱ्या व राज्यातील दि. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी शालेय शिक्षण विभागाने दि. १० जुलै २०२० रोजी काढलेले परिपत्रक रद्द करण्यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासोबत शिक्षक आमदारांची बैठक झाली होती. या बैठकीत शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दि. १० जुलै २०२० ची अधिसूचना सर्व आमदार महोदयांच्या आग्रहामुळे रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. मात्र या बाबीवर शासनपातळीवर पुन्हा घुमजाव झाल्याने कर्मचारी वर्गात नाराजी पसरली आहे.
यावेळी तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळात जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत वाघ, तालुका नेते जनार्दन कडवे, तालुकाध्यक्ष सचिन, सरचिटणीस सुनील सांगळे, अनिल शिरसाठ, सौरभ अहिरराव, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे तालुकाध्यक्ष वैभव गगे, विशाल सोनवणे, प्रशांत देवरे, योगेश कांबळे, योगेश घाडीगावकर आदी उपस्थित होते.