राज्यात चालू खरेदीचा मकाही रेशनमधून विकणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 02:06 PM2017-12-21T14:06:50+5:302017-12-21T14:08:42+5:30
नाशिक : गेल्या वर्षी आधारभुत किंमतीत खरेदी केलेला मका वर्षभरानंतर खराब होऊ लागल्याचे पाहून त्याची एक रूपये किलो प्रमाणे रेशन मधून विक्री सुरू केलेली असताना व सदरचा मका घेण्यास शिधापत्रिकाधारकांचा विरोध कायम असतानाही चालू वर्षी सध्या राज्यात ठिकठिकाणी खरेदी केला जात असलेल्या मक्याची फेब्रुवारीपासून रेशनमधून विक्री करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे नजिकच्या चार महिन्यात रेशनचे धान्य खाणाºयांना सक्तीने मक्याची रोटी खावी लागणार आहे.
राज्यातील नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, जळगाव, सातारा, सांगली, सोलापुर, औरंगाबाद, अमरावती, बुलढाणा, नागपुर या तेरा जिल्ह्यांमध्ये सध्या खरीप हंगामातील भरडधान्य म्हणून ओळखल्या जाणाºया मक्याची राज्य शासनाच्यावतीने आधारभुत किंमतीत खरेदी केली जात आहे. यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे राज्यात मक्याचे उत्पादन वाढले आहे, त्यातच खुल्या बाजारात भाव पडल्यामुळे मका उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासनाने १४२५ रूपये प्रतिक्विंटल दराने आधारभुत किंमतीत मका खरेदी करण्यासाठी पणन महामंडळाकडून खरेदी केंद्रे सुरू केले आहेत. ३१ डिसेंबर पर्यंत शासनाकडून मका खरेदी केला जाणार आहे. सदरचा मका पणन महामंडळाने खरेदी करून तो तालुक्याच्या तहसिलदारांकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या शासकीय वा खासगी गुदामात ठेवायचा आहे. गेल्या वर्षी राज्य सरकारने अशाच प्रकारे १३६५ रूपये आधारभुत किंमतीत मका खरेदी केला होता व राज्यातील ठिकठिकाणच्या गुदामात तो साठवून ठेवला, या मक्याला कीड लागली तर काही ठिकाणी त्याचे पीठ होऊ लागले होते. शिवाय दर महिन्याला गुदामाचे लाखो रूपयांचे भाडे थकत चालल्याचे पाहून नोव्हेंबर महिन्यात शासनाने सदरचा मका सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गंत शिधापत्रिकाधारकांना रेशनमधून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी डिसेंबर महिन्यापासून सुरू झाली असून, अंत्योदय व प्राधान्य कुटुंबियांना दरमहा दिल्या जाणाºया गव्हाच्या प्रमाणात घट करून त्याऐवजी सक्तीचे मका दिला जात आहे. राज्य सरकारने १३६५ रूपये दराने खरेदी केलेला मका रेशनमधून एक रूपये प्रती किलो दराने देण्यास सुरूवात केली असून, त्यातील ७० पैसे कमीशन रेशन दुकानदाराला मिळणार आहे,म्हणजेच सरकारला किलो मागे तीस पैसे मिळतील.