शेतकऱ्यांच्या विकासातच राज्याची प्रगती
By admin | Published: August 15, 2014 12:59 AM2014-08-15T00:59:04+5:302014-08-15T01:01:09+5:30
शेतकऱ्यांच्या विकासातच राज्याची प्रगती
सिन्नर : राज्य आर्थिकदृष्ट्या सर्वात प्रगत असले तरी निसर्गाच्या अवकृपेमुळे राज्यातील केवळ अठरा टक्के जमीन सिंचनाखाली आहे, तर ८२ टक्के क्षेत्र जिरायती आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांची शेती शाश्वत झाली पाहिजे यासाठी साखळी बंधाऱ्याच्या माध्यमातून शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे असून, शेतकऱ्यांचा विकास झाला तरच राज्याची प्रगती होऊ शकते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
जलसंधारणमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली कोमलवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचा साखळी बंधारा लोकार्पण सोहळा पार पडला. आमदार माणिकराव कोकाटे, शिरीष कोतवाल, जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरिराज, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती राजेश नवाळे, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी विलास पाटील, सुकदेव बनकर, व्ही.सी. वखारे, सरपंच संजय बोऱ्हाडे, जे.एम. लिहीतकर, आनंद मोरे, शशिकांत मंगरुळे, अविनाश लोखंडे आदिंसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पाणीटंचाई असणाऱ्या गावांमध्ये बंधारे बांधून टंचाई दूर करण्याचा प्रयत्न साखळी बंधाऱ्याच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात राज्यात एक हजार ७०० बांध बांधण्यात आले असून, आता दुसरा आणि तिसरा टप्पा सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. साखळी बंधाऱ्यांचा उपक्रम चांगला असून, त्यासाठी किमान पाऊस पडण्याची अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली. टॅँकरची संख्या कमी करण्यासाठीच साखळी बंधाऱ्याचा उपक्रम हाती घेतल्याचे ते म्हणाले. पडलेल्या पावसाचा थेंब अन् थेंब साठविण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्यातील ५७ टक्के जनता शेतीच्या उत्पन्नावर निर्भर आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळाली पाहिजे यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. कांद्याच्या किमतीबाबत बोलताना ग्राहकांना खूश करण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी दिला जात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी केंद्र सरकार सोबत आपण शेवटपर्यंत भांडत राहणार असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या जीवनातील दु:ख कमी करून क्रांती घडवून आणण्यासाठी आपत्तीचा धाडसाने सामना करण्यासाठी एकजुटीने लढा उभारण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखविला.
सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने नाही असे म्हणणे चुकीचे असून, केंद्राकडून राज्य शासनाने ११ हजार कोटी रुपये आणून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्याचे जलसंधारणमंत्री राऊत यांनी सांगितले. दुष्काळमुक्त वातावरण निर्मितीला मुख्यमंत्र्यांची मदत झाल्याचे राऊत म्हणाले. टंचाई असणाऱ्या गावांमध्ये बंधारे बांधून टंचाई दूर करण्याचा जलसंधारण खात्याचा प्रयत्न असल्याचे राऊत यांनी सांगितले. आमदार कोकाटे यांनी प्रास्ताविक
केले.
त्यानंतर वडांगळी व कीर्तांगळी येथे कोटा बंधाऱ्याचे, खोपडी येथे देवनदीवरील पूर कालव्याच्या कामाचे तर मुसळगाव येथे क्रीडा संकुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. सुमारे ५७ कोटी रुपयांच्या निधीतून देवनदीवरून पूर्वभागासाठी करण्यात येणाऱ्या पूर कालव्याच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी भरपावसात अनेक नागरिक उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती सभापती बाळासाहेब वाघ, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, दिलीपराव शिंदे, राजेंद्र चव्हाणके, रामदास खुळे, राजेंद्र घुमरे, विजय काटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)भावना व्यक्त केली.