पोलीस प्रशासनाच्या विरोधात ६ ला सीटूचे राज्यव्यापी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:07 AM2018-05-31T00:07:23+5:302018-05-31T00:07:23+5:30
भांडवलदारांच्या सांगण्यावरून पोलिसांनी सीटू युनियनचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला असून, हा गुन्हा पोलिसांनी मागे न घेतल्यास दि. ६ जून रोजी संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सीटूचे सरचिटणीस एम. एच. शेख यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
सातपूर: भांडवलदारांच्या सांगण्यावरून पोलिसांनी सीटू युनियनचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला असून, हा गुन्हा पोलिसांनी मागे न घेतल्यास दि. ६ जून रोजी संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सीटूचे सरचिटणीस एम. एच. शेख यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. पोलिसांनी यापूर्वीदेखील २/३ वेळा डॉ. कराड यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला आहे. आताही कामगारांच्या तथाकथित मारहाणीत डॉ. कराड यांचा काहीही संबंध नसताना पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे. भांडवलदारांच्या दबावाला पोलीस प्रशासन बळी पडत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणचा मंडप उखडून पोलीस प्रशासनाने लोकशाहीविरोधात कृत्य केले होते. न्यायालयीन लढ्यानंतर पुन्हा आंदोलन सुरू झाल्याने पोलीस प्रशासनाला चपराक बसली. या प्रकरणाचा सूड उगवण्यासाठी पोलीस प्रशासनाने डॉ. कराड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप शेख यांनी केला आहे. डॉ. कराड निर्दोष असल्याचा दावाही शेख यांनी केला आहे. यावेळी मुंबई श्रमिक संघाचे डॉ. विवेक मॉन्टेरो, सीटूचे उपाध्यक्ष सईद अहमद, उद्धव भवलकर, सचिव भरमा कांबळे, खजिनदार के. आर. रघू, सीताराम ठोंबरे, आर. एस. पांडे, कल्पना शिंदे आदी उपस्थित होते.
दडपशाहीविरोधात संपूर्ण देशात चळवळ
पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांची भेट घेऊन गुन्हा मागे घेण्याची विनंती केली आहे. गुन्हा मागे न घेतल्यास दि. ६ जून रोजी राज्यात आंदोलन छेडण्यात येणार आहे. नाशिकला संप पुकारण्यात येईल. तरीही गुन्हा मागे घेतला नाहीतर पोलिसांच्या दडपशाहीविरोधात संपूर्ण देशात एक मोठी चळवळ उभारण्यात येणार आहे. यात अन्य कामगार संघटनांनादेखील सहभागी करून घेण्यात येणार आहे.