‘समृद्धी’वर निर्णयासाठी राज्यव्यापी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:12 AM2017-10-30T00:12:02+5:302017-10-30T00:12:09+5:30
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकºयांच्या जमिनी जबरदस्तीने घेतल्या जात असल्याचा आरोप करून यावर राज्यव्यापी आंदोलन करण्यासाठी येत्या ७ नोव्हेंबर रोजी नाशकात राज्यव्यापी बैठक घेण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या शेतकरी संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकºयांच्या जमिनी जबरदस्तीने घेतल्या जात असल्याचा आरोप करून यावर राज्यव्यापी आंदोलन करण्यासाठी येत्या ७ नोव्हेंबर रोजी नाशकात राज्यव्यापी बैठक घेण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या शेतकरी संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला. आयटक कार्यालयात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड. रतन इचम व कॉ. राजू देसले होते. यावेळी राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनांची, भूसंपादनाची व न्यायालयीन लढाईची माहिती उपस्थितांना देण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, सिन्नर तालुक्यांचा गावनिहाय आढावा घेण्यात आला. सिन्नर तालुक्यातील अधिकारी शेतकºयांचा मानसिक छळ तसेच चुकीची माहिती देत आहेत. याचा शेतकºयांनी निषेध केला. इगतपुरी तालुक्यात पेसा कायद्यांतर्गत असलेल्या ग्रामपंचायती समृद्धी महामार्गाच्या विरोधात गेलेल्या असताना दलालांचा वापर प्रशासन करीत आहे. या विरोधात ३० आॅक्टरोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता महसूल आयुक्त महेश झगडे यांची भेट घेण्यात येणार आहे. या बैठकीत राज्यव्यापी आढावा घेऊन, राज्यव्यापी कायदेशीर लढ्याची भूमिका तसेच पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे. या बैठकीस भास्कर गुंजाळ, सोमनाथ वाघ, अरुण गायकर, शिवाजी पवार, दौलत दुभाषे, पांडुरंग वारुंगसे, शांताराम ढोकणे, सोमनाथ तातळे, लालू तातळे, बबन वेलजाळी, सुनील पठाडे, रावसाहेब हरक आदी उपस्थित होते.
७ नोव्हेंबरला बैठक
शेतकरी संघर्ष समिती शासकीय अधिकाºयांकडून शेतकºयांची संमती मिळविण्यासाठी घराचा मोबदला, जिरायती बागायती जमिनी लावण्याचे तसेच इतर आमिषांचे संदर्भात लेखी तक्रार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी संघर्ष समितीची राज्यस्तरीय बैठक ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता मानव सेवा केंद्र, सिंहस्थनगर, सिडको येथे बैठक बोलाविण्यात आली आहे.