राज्यव्यापी कामगार परिषद : संघटनांना एकत्र येण्याचे आवाहन एप्रिलमध्ये कामगारांचा मंत्रालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:08 AM2018-01-07T00:08:18+5:302018-01-07T00:23:49+5:30
नाशिकरोड : केंद्र व राज्यातील शासन कामगार कायद्यात मालकधार्जिणे बदल करत असून, कामगारांना हद्दपार करण्याचे षडयंत्र रचले जात आहे.
नाशिकरोड : केंद्र व राज्यातील शासन कामगार कायद्यात मालकधार्जिणे बदल करत असून, कामगारांना हद्दपार करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. त्याला सर्वच क्षेत्रातील कामगार संघटनांनी एकत्र येऊन विरोध केला पाहिजे, असे प्रतिपादन कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे सहसंघटक विश्वास उटगी यांनी केले. सर्व कामगारांची एकजूट करून जिल्हानिहाय मेळावे घेऊन चार कोटी कामगारांच्या सह्यांचे निवेदन देण्यासाठी एप्रिल महिन्यात मंत्रालयावर एक लाख कामगारांचा मोर्चा काढण्याचा ठराव यावेळी करण्यात आला.
यू.एस. जिमखाना येथे शनिवारी (दि.६) विविध क्षेत्रांतील कामगार, कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीतर्फे आयोजित राज्यस्तरीय कामगार-कर्मचारी परिषद हिंद मजदूर सभा प्रदेश अध्यक्ष शंकरराव साळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी बोलताना संयुक्त कृती समितीचे सहसंघटक विश्वास उटगी म्हणाले की, पब्लिक सेक्टर विकून ४ लाख कोटी रुपये करण्याचे शासनाचे मनसुबे आहेत. रिक्त पदे भरायची नाहीत, राज्यातील ५६ महामंडळे बंद करण्याच्या हालचाली सुरू असून, सर्व काही उद्योगपती व उद्योजकांच्या खिशात घालण्याचा डाव असल्याचा आरोपही उटगी यांनी केला. परिषदेमध्ये जे ठराव मंजूर करण्यात आले त्यांची पुस्तिका करून ती तळागाळातील कामगारांपर्यंत पाहचवून कामगारांचे प्रबोधन केले पाहिजे. याकरिता संपूर्ण राज्यात कामगारांनी सह्यांची मोहीम राबवून एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्व क्षेत्रातील एक लाख कामगारांचा मोर्चा काढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन उटगी यांनी केले. अध्यक्ष पदावरून बोलताना शंकरराव साळवी यांनी सध्याचे भांडवलशाही शासन असून, कामगार चळवळ संपुष्टात आणण्याचे कारस्थान करत असल्याचा आरोप केला. हिंद मजदूर सभेचे संजय वढावकर वगळता इतर सर्वच कामगार संघटनाच्या प्रतिनिधींनी केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या कामगारविरोधी धोरणावर कडाडून टीका केली. व्यासपीठावर मुद्रणालय मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, हिंद मजदूर सभेचे राज्य उपाध्यक्ष राजेश टाकेकर, कार्तिक डांगे, वर्क्स फेडरेशन राज्य उपाध्यक्ष ज्योती नटराजन, बॉश एम्प्लॉईज युनियनचे प्रवीण पाटील, श्रमिक संघाचा महासंघ विजय कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी कामगार पदाधिकाºयांच्या हस्ते कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांच्या पुतळ्याचे पूजन व दीपप्रज्वलन करून उद्घाटन झाले. स्वागत प्रवीण पाटील यांनी केले. प्रास्ताविक कामगार नेते जगदीश गोडसे व सूत्रसंचालन विनोद पाटील यांनी केले.
परिषदेमध्ये बारा ठराव मंजूर
परिषदेमध्ये शासन मालकधार्जिणे व कामगार हितास बाधा आणणारे बदल करून सध्याचे कायदे व लाभ मोडीत काढत आहे. ४४ केंद्रीय कामगार कायदे रद्द करून त्याऐवजी ४ कामगार संहिता नव्याने करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने अप्रेंटीस कायदादेखील बदलला आहे. देशात ९० टक्के कामगारांना कोणत्या कामगार कायद्याचे संरक्षण नाही, ज्या कामगारांना कायद्यान्वये संरक्षण आहे तेथे अंमलबजावणी होत नाही अशा शासनाच्या कामगार विरोधी निर्णयाच्या विरोधात १२ ठरावांना मंजुरी देण्यात आली. तसेच कामगार हिताच्या विविध १८ मागण्यांच्या ठरावालादेखील मंजुरी देण्यात आली.