प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा दर्जा खालवला
By admin | Published: May 16, 2015 01:18 AM2015-05-16T01:18:36+5:302015-05-16T01:19:02+5:30
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा दर्जा खालवला
नाशिक : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत निकृष्ट दर्जाची कामे केली जात असल्याच्या तक्रारींचा पाढा खासदारांनी वाचल्यानंतर केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांना सूचना दिल्या. शासकीय विश्रामगृह येथे केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी विभागातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. बैठकीस खासदार हरिश्चंद्र चव्हाण, हेमंत गोडसे, ए. टी. पाटील, रक्षा खडसे, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे उपस्थित होते. यावेळी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत राज्यभरात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. एप्रिल २०१५ अखेरपर्यंत नाशिक विभागात मंजूर झालेल्या २५५ कामांपैकी १९४ कामे पूर्ण झाली आहेत, तर ६१ कामे निधीअभावी रखडली आहेत. या कामांसाठी ४१८ कोटी ९१ लाख ७० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. प्रत्यक्षात २८५ कोटी २७ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाल्याने त्यातून १९४ कामेच पूर्ण करता आली, तर उर्वरित ६१ कामांसाठी लागणारा ११८ कोटी ९३ लाख रुपयांच्या निधीची प्रतीक्षा असल्याने विभागातील योजनेअंतर्गत कामे खोळंबली आहेत. दरम्यान, केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी उर्वरित निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे सांगितले. गेल्या अर्थसंकल्पात या योजनेकरिता पुरेशा निधीची तरतूद केली नसल्यानेच निधीची चणचण भासत असल्याची कबुलीही भगत यांनी दिली. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण व हेमंत गोडसे यांनी पेठ, सुरगाणा या भागात या योजनेअंतर्गत केलेल्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याची तक्रार केली.