मुक्काम नाशिकला; वाट मुंबईची; नजरा नागपूरकडे
By Sandeep.bhalerao | Published: December 17, 2023 03:17 PM2023-12-17T15:17:52+5:302023-12-17T15:18:04+5:30
नागपूरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करीत असल्याने पुढील निर्णयावर मोर्चाची दिशा ठरणार आहे.
नाशिक: नंदुरबार येथून मुंबईच्या दिशेने निघालेला आदिवासी बांधवांचा बिऱ्हाड मोर्चा शनिवारी (दि.१६) रात्री नाशिकच्या वेशीवर दाखल झाला मात्र शिष्टमंडळ चर्चेसाठी नागपूरला गेल्याने आदोलनकर्त्यांच्या नजरा नागपूरकडे लागल्या आहेत. नागपूरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करीत असल्याने पुढील निर्णयावर मोर्चाची दिशा ठरणार आहे.
सत्यशोधक कष्टकरी शेतकरी आदिवासी संघटनेच्यावतीने शेतकरी, आदिवासी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी नंदुरबार येथून मोर्चाला सुरूवात झाली. मुबईत मंत्रालयाच्या दिशेने निघालेला मोर्चा नाशिकमध्ये दाखल झाला असून पुढील निर्णय येईपर्यंत आंदोलक नाशिकमध्येच थांबले आहेत. या ठिकाणी झालेल्या सभेत आदिवासी नेत्यांनी मार्गदर्शन केले.
या मोर्चात जवळपास पंधरा हजार आदिवासी बांधव सहभागी झाले असून हातात लाल बावटा आणि डोक्यावर लाल टोपी परिधान करून मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजीने नाशिक परिसर दणाणून सोडला आहे. दुपारी तीन वाजेपर्यंतही शिष्टमंडळाचा कोणताही निर्णय प्राप्त झाला नसल्याने आंदोलकांनी नाशिकला ठाण मांडले आहे.