जीव धोक्यात घालून प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 09:51 PM2018-08-08T21:51:04+5:302018-08-08T21:52:25+5:30
पायरपाडा येथील नागरिकांना व विद्यार्थ्यांना दरवर्षी पावसाळ्यात पळसन गावाकडे जाण्यासाठी नदीपात्रात उतरून जीव धोक्यात घालून जावे लागत आहे.
पळसन जवळील सातशे लोकसंख्या असलेले पायरपाडा हे गाव अनेक सोयी सुविधांपासून वंचित आहे. येथील नागरिकांना दैनंदिन व्यवहारासाठी व विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रोज जीव धोक्यात घालून पुरात नार नदी ओलांडून जावे लागत आहे. हा प्रकार दर पावसाळ्यात दिसून येतो. त्यांच्या या गंभीर प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार आहे. पळसन व पायरपाडा दरम्यान कोणताही पूल नसल्याने पावसाळ्यात ही गंभीर समस्या निर्माण होते. याबाबत जूनी
मागणी असूनही दूर्लक्ष झाले आहे. पावसाळा सुरू झाला की, हा जीवघेणा खेळ सुरू होतो. लोकप्रतिनिधींपर्यंत आवाज पोहचत नाही हे मोठे दुर्भाग्य असल्याची जनभावना आहे. पावसाळा संपेपर्यंत काही नागरिक पळसनमध्ये ओळखीच्या ठिकाणी दूचाकी वाहने ठेवतात. म्हणजे नार नदी ओलांडून पळसनला यायचे, तेथून दूचाकी किंवा अन्य वाहनाने तालुक्याला यायचे. कामे उरकून पळसनला परत जावून संध्याकाळी पुन्हा नदीपात्र ओलांडून पायरपाड्याला जायचे. पावसाळा संपून जेव्हा नदीपात्र कोरडे होते, त्यावेळी उर्वरित आठ - नऊ महिने या नार नदीच्या कोरड्या पात्रातून वाहने ये - जा करतात. पावसाळा सुरू झाला की पुन्हा ये रे माझ्या मागल्या सुरू होते.
एखादी व्यक्ती आजारी पडलीच तर तिला दवाखान्यात नेता येत नाही. एखादा खूपच आजारी पडल्यावर पोहणाऱ्याला शोधून नार नदी पार करून द्या अशी विनंती करावी लागते. पुराच्या पाण्यात उतरण्याशिवाय पर्याय नसतो. रु ग्णांना डोली करून आणणेही कठीण झाले आहे.
नार नदी पात्रातून चाळीस ते पन्नास विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जावे यावे लागते. नागरिकांनाही कामानिमित्त जावे यावे लागते. स्वातंत्र्य काळापासून पायरपाडा गावाची अशीच परिस्थिती आहे. मोठ्या पूलाची मागणी लोकप्रतिनिधी व शासनाकडे केली मात्र दुर्लक्ष होत आहे.
- सुभाष चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य, पळसन.