लगे रहो प्रवीणभाई!
By admin | Published: January 11, 2015 12:06 AM2015-01-11T00:06:57+5:302015-01-11T00:07:10+5:30
लगे रहो प्रवीणभाई!
हेमंत कुलकर्णी - नाशिक
बिचारा संजूबाबा, रजा नामंजूर झाल्याने विन्मुख होऊन येरवड्याकडे चालला गेला. हरकत नाही. त्याने लोकाना दिलेली गांधीगिरीची शिकवण तर त्याच्या पाठोपाठ गेली नाही ना? ती आजही लोकांच्या स्मरणात आहे आणि त्यांच्या नजरेत अनुकरणीयदेखील आहे. तसे नसते तर आपल्या गावाचे नवे नगर कोतवाल प्रवीणभाई यांच्यातही असे यकायक परिवर्तन झाले असते का बरे?
मुन्ना कसा, मुन्नाभाई होण्यापूर्वी, दे मार; हाण तोड अशा कामात पटाईत. पण त्याला आधी गावली जान्हवी आणि तिच्या मागोमाग मग सापडले, बापूजी! आमूलाग्र परिवर्तन. भाषेपासून कृतीपर्यंत आणि नावापासून खाण्या आणि विशेषत: पिण्यापर्यंत सारे रातोरात पालटून गेले.
आमच्या प्रवीणभाईंचेही तसेच नाही का बरे झाले? पूर्वाश्रमातल्या त्यांनी आपल्या एरवी कामचुकार बाशिंद्यांना कामाला लावले. प्रत्येकाच्या हातात छिनी आणि हातोडा. सोबत पोलिसांचा फौजफाटा. गाठला गंगापूर रोड. दिसली भिंत हाण हातोडा. दिसला बोर्ड, तोड त्याचे पेकाट. आढळला पेव्हर ब्लॉक, घुसव जेसीबीचा पंजा आणि उचकटव त्याला. दोन दिवस मोठी धमाल. पब्लिक खूष. याला म्हंत्यात जंक्शन अधिकारी. या खुषी खुषीत मग हे कुणी ध्यानातच घेतलं नाही की, हवेत लटकणारा बोर्ड वाहतुकीला कसा अडथळा ठरतो बुवा? जी पानटपरी अतिक्रमित ठरते, तिच्या खालची जमीन मात्र तशी का ठरत नाही बरे? अतिक्रमित म्हणून ज्या पेव्हर ब्लॉकच्या खाली जेसीबीचा पंजा घुसवला, तो पेव्हर ब्लॉक कोणा नगरसेवकाच्या निधीतून बसवला होता म्हणून कसा वाचावा गडे? म्हणजे तुमच्या आमच्या सारख्या येरागबाळ्यांचं ते अतिक्रमण आणि नगरसेवकाचं ते सुशोभीकरण? पुन्हा निधी नावाला नगरसेवकाचा, पण तो काय त्याच्या निढळाच्या घामाचा? तो तर तुम्ही आम्हीच ‘म्युन्शिपाल्टीच्या’ खजिन्यात जमा केलेला.
कुंभात लोक येणार; गंगाकाठी. ते कशाला गंगापूर आणि कॉलेज रोडवर कडमडायला येतात? तरी हरकत नाही. इंग्रजीत म्हणतात ना, वेल बिगन इज हाफ डन! गंगापूर रोडचा झाला ना मोकळा श्वास, आता श्वास रोखून पाहू आणि रामकुंड परिसर, गंगाकाठ, गो.ह.देशपांडे पथ, भद्रकाली, शिवाजी रोड आणि महात्मा गांधी रोड म्हणजे कुंभकाळात जिथे पायी चालायलाही जागा उरत नाही, तिथला श्वास कसा मोकळा होतो, ते पाहू !
पण अरारा, म.गांधी रोड म्हटलं आणि तिथे सिनेमात जसा मुन्नाचा मुन्नाभाई झाला, तसा इथे कमिश्नरचा प्रवीणभाई झाला. नको; नको, हिंसा नको. अत्याचार नको. बळजबरी नको. कुणाशी वाकुडेपण घेणं नको. ‘बाबांनो, मी काही अजून डीसी रुल का काय म्हणतात, त्याचा अभ्यास केलेला नाही. तुम्ही तो केलेला असणार. अतिक्रमण तुम्हीच केलं असणार. तेव्हां तुम्हीच ते काढून घ्या बरं. काढाल ना बाळांनो’? अशी छान गांधीगिरी प्रवीणभाईच्या मुखावाटे पाझरली. शेवटी मतपरिवर्तन आणि साक्षात्कार म्हणून काही चीज आहे की नाही?
आता काही वात्रट म्हणतात, गंगापूर रोडवरील व्यापारी झाले तरी बिचारे पांढरपेशेच. (अपवाद पेव्हरवाला नगरसेवक) काय विरोध करणार आणि कसा करणार? ते बिचारे सैराटल्यासारखे पळायचे आणि कमिश्नरचे मुलाजीम त्यांच्या मागं हातोडे घेऊन धावायचे. त्यामुळं जो गवसला, त्याच्या टाळक्यात हाणला बत्ता आणि काय. पण तिकडं म्हंजे ‘रामकुंड ते म.गांधी’ पर्यंत असलं काही नाही बरं. तिथं बाजिंदेच सैराटतात असा आजवरचा अनुभव. त्यामुळं नकोच तिथं कमिश्नरगिरी. तिथं आपली गांधीगिरी. तसंही पाच पन्नास इमारतींचं नुकसान केलं ना. त्याच्यातच हायकोर्ट समाधानी होणार आहे ना, मग कशाला उगा पाण्यात राहून मगरीशी वैर? त्यापरीस आपली गांधीगिरी बरी. म्हणूनच एकसाथ सारे, एक सुरात म्हणू या, ‘लगे रहो, प्रवीणभाई’!