दिंडोरीत बिऱ्हाड मोर्चाचा मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2022 12:54 AM2022-02-25T00:54:27+5:302022-02-25T00:55:03+5:30
अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने दिंडोरी तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी बिऱ्हाड मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत जागेवरून उठणार नाही, अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही ठिय्या कायम आहे.
दिंडोरी : अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने दिंडोरी तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी बिऱ्हाड मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत जागेवरून उठणार नाही, अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही ठिय्या कायम आहे.
दिंडोरी तहसील कार्यालयासमोर किसान सभेच्या वतीने बिऱ्हाड मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, बुधवारपासून (दि. २३) मोर्चेकरी आपापले बिऱ्हाड घेऊन ठाण मांडून बसले आहे. कालचा मुक्कामही मोर्चेकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोरच केला. भाजप सरकारच्या शेतकरी व कामगारविरोधी धोरणांसह वनाधिकार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, सर्व दावे मंजूर करावे, जिल्ह्यातील कंपन्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावे, पेसा निधीचा प्रत्येक ग्रामपंचायतीत वापर करून विकासकामे पूर्ण करावी, प्रत्येक खेड्यापाड्यात रस्ता, पाणी, विजेची व्यवस्था करावी, स्वच्छ भारत मिशन योजनेची काटेकोर अंमलबजावणी करावी आदींसह विविध मागण्यांसाठी बिऱ्हाड मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चात किसान सभेचे राज्य कमिटी सदस्य रमेश चौधरी, तालुकाध्यक्ष देवीदास वाघ, आप्पा वटाणे आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला आहे.