व्यापारी संकुलात चोरी
By admin | Published: January 24, 2017 12:16 AM2017-01-24T00:16:16+5:302017-01-24T00:16:32+5:30
बोलठाण : सततच्या चोऱ्यांमुळे आज गाव बंदची हाक
नांदगाव : तालुक्यातील बोलठाण येथील बसस्थानक परिसरातील व्यापारी संकुलात चार ते पाच व्यावसायिकांच्या दुकानांचे शटर उघडून एक लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली. रविवारी मध्यरात्री हा प्रकार घडला असल्याचा संशय व्यक्त होत आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे दुकाने उघडण्यासाठी आलेल्या व्यवसायिकांच्या लक्षात हा प्रकार आला. दुकानांचे शटर वाकवून चोरी करण्यात आली. तालुक्यातील बोलठाण येथील बसस्थानक परिसरात व्यापारी संकुले आहेत. त्यातील काही दुकानांचे शटर तुटलेल्या अवस्थेत दिसून आल्याने स्थानिक व्यापारीवर्गाने नांदगाव पोलिसांना ही बाब कळविली. हरिओम मोबाइल, उदय व गजानन नावाची दोन किराणा दुकाने व बालाजी अग्रिकल्चर्स आदि दुकानांतून मोबाइल, शेती औजारे, रोकड असा एकूण एक लाखाच्या आसपास किमतीच्या मालाची चोरी करून चोरटे फरार झाले. ही चार ते पाच जणांची टोळी असावी असा संशय असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत. विशेष म्हणजे, याच भागात बोलठाणचे पोलीस औटपोस्टदेखील आहे. (वार्ताहर)