कालिदासच्या आवारातील बसमधून चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:16 AM2019-05-11T00:16:17+5:302019-05-11T00:17:09+5:30
महापालिकेने कालिदास कलामंदिर स्मार्ट केले असले तरी सुरक्षा व्यवस्था मात्र सक्षम नसून त्याचा अनुभव गुरुवारी (दि.९) अलबत्या गलबत्या नाटकाच्या वेळी आला आहे. समस्त टीम नाट्यप्रयोगात दंग असतानाच शिवाजी उद्यानातून उडी मारून कालिदासच्या आवारात शिरलेल्या एका चोरट्याने कलावंताच्या बसमधून शिरून एका बॅक स्टेज आर्टिस्ट व चालकाच्या बॅगा लंपास केल्या आहेत.
नाशिक : महापालिकेने कालिदास कलामंदिर स्मार्ट केले असले तरी सुरक्षा व्यवस्था मात्र सक्षम नसून त्याचा अनुभव गुरुवारी (दि.९) अलबत्या गलबत्या नाटकाच्या वेळी आला आहे. समस्त टीम नाट्यप्रयोगात दंग असतानाच शिवाजी उद्यानातून उडी मारून कालिदासच्या आवारात शिरलेल्या एका चोरट्याने कलावंताच्या बसमधून शिरून एका बॅक स्टेज आर्टिस्ट व चालकाच्या बॅगा लंपास केल्या आहेत. भर दुपारी हा प्रकार घडल्याचे चक्क सीसीटीव्हीत कैद झाले असून, तरीही चोरटा सापडू शकला नाही, तर दुसरीकडे प्रवेशद्वारावर अनेक सुरक्षा रक्षक ठेवणाऱ्या महपालिकेला पाठीमागील बाजूस साधे कर्मचारी तैनात करता आले नसल्याने कलावंतांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या सुट्टीचे दिवस असल्याने नाटकांचे प्रयोग वाढले आहेत. गुरुवारी (दि.९) वैभव मांगले यांची प्रमुख भूमिका असलेला अलबत्या गलबत्या या प्रसिद्ध बालनाटकाचा प्रयोग सकाळी ९ वाजता आणि दुपारी १ वाजता होता. पैकी दुपारचा प्रयोग सुरू असताना कालिदासच्या पाठीमागील शिवाजी उद्यानाच्या भिंतीवरून एका चोरट्याने उडी घेऊन कालिदासच्या प्रांगणात प्रवेश केला. त्यानंतर कलावंतांच्या बसमध्ये प्रवेश केला. त्याठिकाणहून त्याने वैभव शिंदे या बॅक स्टेज आर्टिस्ट तसेच बसचालकाच्या बॅगा लांबविल्या. दोघांच्या बॅगांमध्ये कपडे आणि पैसे होतेच; परंतु शिंदे यांच्या बॅगमध्ये पारपत्र, मोबाइलसह अन्य चीज वस्तू होत्या. त्यादेखील चोरीस गेल्या आहेत.
कलावंतांची बस ही कालिदासच्या आवारात उभी असल्याने आणि परिसरात सुरक्षा रक्षक असल्याने चालक निर्धास्त होता. तो काही वेळासाठी जागेवरून हालल्यानंतर हा प्रकार घडला.
या घटनेनंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली आणि सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यावेळी उद्यानावरून उडी घेऊन चोरट्याने संधी साधल्याचे आढळले. महापालिकेचे सुरक्षा रक्षक हे फक्त प्रवेशद्वाराशीच होते.
महापालिकेने केवळ कालिदास कलामंदिर स्मार्ट केले; परंतु त्यातील त्रुटी जैसे थे आहेत. मिळकत व्यवस्थापक राजू आहेर, प्रशांत पगार यांना चोरीबाबत कळवूनही ते येथे आले नाही. कालिदासमधील व्यवस्थापक आणि सुरक्षा रक्षकांचे त्याकडे लक्ष नाही, यासर्व संबंधितांची चौकशी करून कारवाई झाली पाहिजे.
- शाहू खैरे, नगरसेवक व स्मार्ट सिटी कंपनीचे संचालक
महापालिकेने कालिदास कलामंदिरची सुरक्षा व्यवस्था सक्षम ठेवणे आवश्यक आहे. पुढे सुरक्षा रक्षक असल्याने बस स्टेजच्या जवळ उभी केली होती; मात्र तरीही चोरी झाली. बालनाटकांना मुलेही येतात, त्यांच्याबाबतीत अशी दुर्घटना होऊ शकते, यामुळे केवळ सीसीटीव्ही बसवून उपयोग नाही तर मागील बाजूसही सुरक्षा रक्षक असावेत. किमान ते फिरते असावेत.
- राहुल भंडारे, दिग्दर्शक, अलबत्या गलबत्या