पाऊले चालती निवृत्तीनाथांची वाट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 02:41 PM2020-01-17T14:41:52+5:302020-01-17T14:42:21+5:30
त्र्यंबकेश्वर : धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा... असे ...
त्र्यंबकेश्वर : धन्य धन्य निवृत्ती देवा
काय महिमा वर्णावा...
असे एक ना अनेक संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांवर केलेले संत तुकाराम, संत नामदेव महाराज आदी संतांचे अभंग गात नाशिक जिल्ह्यातुनच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रातुन अनेक पायी दिंड्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरकडे झेपावत आहेत. एकुणच त्र्यंबकेश्वरकरांना आता निवृत्तीनाथ महाराज यात्रेचे वेध लागले आहेत तर वारकरी भाविक यांना निवृत्ती रायाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. परवापासुन लहान दिंड्या येण्यास सुरु वात होईल तर दशमीला सायंकाळ पर्यंत सर्व मोठ्या दिंड्या त्र्यंबक मध्ये दाखल होतील. सुमारे ६०० ते ६५० दिंड्या येण्याची शक्यता आहे.
येत्या पौष वद्य एकादशी (दि.२०) सोमवार या दिवशी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची यात्रा भरणार आहे. या निमित्ताने नवमी दशमी एकादशी व द्वादशीअशी चार ते पाच दिवस ही यात्रा भरत असते. वास्तविक खरी यात्रा दशमी एकादशी व द्वादशी पर्यंत अशी तीनच दिवसापर्यंत चालते. या पाशर््वभूमीवर नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आतापर्यंत दोन प्रशासकीय बैठका खास यात्रा नियोजन व निर्मल वारी संदर्भात झाल्या त्यानंतर त्र्यंबक नगरपरिषदेची बैठक झाली. तर परवा प्रत्यक्ष जिल्हाधिकारी सुरज मांढरे, नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षक आरती सिंह, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसिलदार दीपक गिरासे, नगराध्यक्ष पुरूषोत्तम लोहगावकर, मुख्याधिकारी डॉ.प्रविण निकम, पोलीस पोलीस उपविभागीय अधिकारी भिमाशंकर ढोले, रामचंद्र कर्पे, शहर अभियंता अभिजित इनामदार आदी मान्यवर बैठकीच्या अगोदर यात्रा पटांगण, गावातील यात्रा भरते ती नियोजित गर्दीची ठिकाणे आदी ठिकाणी पदयात्रेने पाहणी केली. त्यानंतर यात्रेत सहभागी होणा-या यंत्रणांची व पालिका प्रशासनाची संयुक्त बैठक पार पडली.
निवृत्तीनाथ यात्रा अवघ्या दोन तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे.महाराष्ट्रातुन विविध गावातील तसेच प्रमुख संताच्या पायी दिंड्या निवृत्तीरायाच्या दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरची वाट झपाट्याने तुडवित आहेत. कधी जीवघेण्या थंडीत तर कधी कधी दिवसा तिव्र उन्हाची पर्वा न करता वारकरी भाविक केवळ निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी चालत राहतात.