पहिला डोस शंभर टक्के करण्याच्या दिशेने पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2021 01:58 AM2021-10-20T01:58:15+5:302021-10-20T01:59:06+5:30
जास्तीत जास्त नागरिकांना लसींचे संरक्षण मिळावे यासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेला मुदतवाढ मिळालेली आहे. ही मोहीम आता दोन नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असल्याने नाशिक जिल्ह्यातील पहिला डोस शंभर टक्के करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा कोविड लसीकरण समन्वयक गणेश मिसाळ यांनी दिली. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यात लसीकरणाची गती वाढविण्यात आली आहे.
नाशिक : जास्तीत जास्त नागरिकांना लसींचे संरक्षण मिळावे यासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेला मुदतवाढ मिळालेली आहे. ही मोहीम आता दोन नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असल्याने नाशिक जिल्ह्यातील पहिला डोस शंभर टक्के करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा कोविड लसीकरण समन्वयक गणेश मिसाळ यांनी दिली. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यात लसीकरणाची गती वाढविण्यात आली आहे. जिल्ह्याला मुबलक प्रमाणात लससाठा उपलब्ध होत असून दिवसाला साधारणत: ५० हजार नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. त्यामुळे पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्यादेखील वाढत असून जिल्ह्यात ६२ टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. आता शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट असल्याने दिवाळीपूर्वी लसीकरण करण्याला प्राधान्य दिले जाणार असल्याचेही मिसाळ यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित तहसिलदार, गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना त्यांच्या तालुक्यात लसीकरणाचे प्रमाण टक्केवारी वाढवावी आणि कमी टक्केवारी असलेल्या तालुक्यांनी जिल्ह्यात पहिल्या डोसचे सरासरी ६२ टक्के लसीकरण होईल या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. विशेषत: मालेगाव महापालिका, येवला, नांदगाव, चांदवड, सुरगाणा तालुका येथील सर्व तालुकास्तरीय प्रमुख यंत्रणा यांनी समन्वयाने प्रयत्न करावेत. बागलाण तालुक्याने कमी कालावधीत चांगली प्रगती केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६२ टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
मिशन कवचकुंडल माेहिमेत जिल्ह्यातील लसीकरणाची गती वाढवण्यास मदत झाली असल्याने आता सर्वत्र लस सहज उपलब्ध होत आहे. नवरात्रोत्सवात देवस्थानांच्या ठिकाणी राबविण्यात आलेल्या मोहिमेचादेखील चांगला परिणाम दिसून आला. आगामी सण, उत्सवाच्या काळातदेखील अशाच प्रकारे लसीकरण मोहीम राबविली जाण्याचा शक्यता आहे. नागिरकांना लसींचे संरक्षण मिळावे आणि कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी सण, सोहळ्यात जास्तीत जास्त जनजागृती करण्याचा उपक्रमदेखील या मोहिमेतून राबविला जाणार आहे.