ताप न आल्यास कोरोना लसीबाबत अद्यापही संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:17 AM2021-09-12T04:17:36+5:302021-09-12T04:17:36+5:30
नाशिक : कोरोनाच्या लसीकरण मोहिमांबाबत अद्यापही अनेकांना शंका आहेत. लसीकरण केल्यानंतर काहींना ताप आला तर काहींना कोणताच त्रास झाला ...
नाशिक : कोरोनाच्या लसीकरण मोहिमांबाबत अद्यापही अनेकांना शंका आहेत. लसीकरण केल्यानंतर काहींना ताप आला तर काहींना कोणताच त्रास झाला नाही. त्यामुळे ताप आला नाही, म्हणजे लस खरी की खोटी अशा प्रकारच्या शंकाकुशंकांनीदेखील नागरिकांना घेरले. त्यात देशात काही ठिकाणी केवळ लस टोचल्याचे दाखवून केवळ सुईच टोचल्याचे प्रकार घडल्याने त्याबाबतही अनेकांच्या मनात आपल्याला नक्की लस दिली का नाही, असादेखील संभ्रम निर्माण झाला होता.
बहुतांश लसी या कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर दहा ते बारा महिन्यात तयार झाल्या आहेत. मग काही गडबड नाही ना, घाई-गडबडीत लसींना परवानगी मिळाल्याने त्यात काही त्रुटी असतील, अशी अनेकांना शंका आहे. लस घेतल्यानंतर साधारणपणे पहिला दिवस थोडाफार ताप, लस घेतलेल्या जागी सूज किंवा तो भाग दुखणं असा त्रास होऊ शकतो. कोव्हिडची लस घेतल्यामुळे तुम्हाला कोव्हिड-१९ होणार नाही. पण, एक शक्यता अशी आहे की, लस घेण्यापूर्वीच तो तुम्हाला झालेला असेल. पण, त्याची लक्षणं तुमच्यात दिसत नसतील. आणि लस घेतल्यानंतर ती दिसायला लागली.
इन्फो
व्यक्तीपरत्वे भिन्न त्रास
कोविशिल्ड आणि को-वॅक्सिन या दोन्ही लस मेलेल्या कोरोना व्हायरसच्या स्पाईक प्रोटीनमधील अंश घेऊन तयार करण्यात आल्या. पण, म्हणून त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कुणालाही होत नाही. उलट या रोगाबद्दल रोगप्रतिकारक शक्ती शरीरात निर्माण होऊन रोगापासून तुमचा बचाव होतो. पण कोरोनाची लस घेतल्यानंतरही तुम्हाला याचा संसर्ग होण्याची शक्यता असते. कोणतीही एक लस अधिक त्रासदायक असे नसून व्यक्तिपरत्वे त्रासात भिन्नता आढळते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
लसीनंतर काहीच झाले नाही
मी लस घेतल्यानंतर मला कोणताच त्रास झाला नाही. त्यामुळेच मला दिलेली लस नक्की योग्य आणि योग्य तापमान ठेवून दिली होती का नाही? अशी शंका मनात निर्माण झाली आहे. थोडा तरी त्रास होतो, असे इतरांकडून ऐकल्याने मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
प्रशांत निरभवणे, नागरिक
इतरांनी सांगितलेले वर्णन ऐकून मी लस घ्यायला आधी घाबरत होतो. पण लस घेतल्यानंतर मला अजिबातच त्रास झाला नाही. त्यामुळे लस नक्की दिली गेली की नुसती सुई टोचली, अशी शंकादेखील मनात निर्माण झाली असून दुसऱ्या लसनंतरच खरे काय ते समजेल, असे वाटते.
शशिकांत पाटील, नागरिक