विद्रोहाच्या स्फुल्लिंगाची अद्यापही उपेक्षाच
By admin | Published: July 17, 2016 12:52 AM2016-07-17T00:52:18+5:302016-07-17T00:56:02+5:30
आज जयंती : प्रख्यात साहित्यिक बाबूराव बागुल यांच्या स्मारकाची घोषणा हवेतच
सुदीप गुजराथी नाशिक
‘वेदाआधी तू होतास’ असे सांगत आपल्या लेखणीतून विद्रोहाचा अंगार फुलवणारे दिवंगत साहित्यिक बाबूराव बागुल यांच्या स्मारकाची उपेक्षा सुरूच आहे. बागुल यांच्या निधनानंतर अनेकांनी त्यांच्या स्मारकासह अन्य बऱ्याच घोषणा केल्या; मात्र त्यातील एकही घोषणा प्रत्यक्षात येऊ शकलेली नाही. त्यामुळे या प्रतिभावंत साहित्यिकाला मृत्यूनंतरही त्याच्या मूळगावीच उपेक्षेच्या यातना सोसाव्या लागत असल्याचे चित्र आहे.
‘जेव्हा मी जात चोरली होती’, ‘मरण स्वस्त होत आहे’, ‘सूड’, ‘वेदाआधी तू होतास’ यांसारखे तेजस्वी साहित्य निर्माण करणाऱ्या बाबूराव बागुल यांचे नाशिक येथे २६ मार्च २००८ रोजी निधन झाले. या बुद्धिप्रामाण्यवादी साहित्यिकाचे अवघ्या महाराष्ट्राला स्मरण राहावे, यासाठी त्यांच्या निधनानंतर अनेक घोषणा करण्यात आल्या; मात्र त्यांची अंमलबजावणी होऊ शकली नाही. बागुल यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगीच तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सरकार व लोकसहभागातून नाशिकमध्ये बाबूराव बागुल यांचे भव्य स्मारक उभारण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. बागुल यांचे नाशिकजवळच्या विहितगाव येथे निवासस्थान आहे. या घरासमोरच्या मोकळ्या जागेत सहकारी तत्त्वावर चालणारी प्रिंटिंग प्रेस उभारावी, त्यातून दर्जेदार साहित्याची छपाई व्हावी, बेरोजगारांना काम मिळावे, असे बागुल यांचे स्वप्न होते. त्या दृष्टीने काही राजकीय नेते व कार्यकर्त्यांनी हालचालही सुरू केली होती. तत्कालीन केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही सरकारच्या वतीने मदत करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र हे काम पुढे सरकू शकले नाही.
तत्कालीन महापौर विनायक पांडे यांनी कोलकात्यातील नॅशनल लायब्ररीच्या धर्तीवर राष्ट्रीय स्तरावरील ग्रंथालय उभारून त्याला बाबूराव बागुल यांचे नाव देण्याची घोषणा केली होती. ते बागुल यांच्यासारख्या विचारवंताला साजेसे स्मारक ठरले असते; मात्र ही घोषणा हवेत विरली.
याशिवाय बागुल यांच्या मुलांना महापालिकेत नोकरी देण्याचे, त्यांचे समग्र साहित्य प्रकाशित करण्याचे आश्वासनही देण्यात आले, घोषणाही करण्यात आल्या. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने ‘जनस्थान’ पुरस्कार प्रदान समारंभातही प्रतिष्ठानच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी बागुल यांची उपलब्ध नसलेली पुस्तके प्रकाशित करण्याची घोषणा केली होती; मात्र यापैकी एकही काम प्रत्यक्षात अवतरू शकले नाही. गंगाधर अहिरेंसारख्या त्यांच्या काही कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे महाकवी कालिदास कलामंदिरात त्यांची तसबीर लागू शकली एवढेच. तेवढे वगळल्यास मराठी साहित्याला क्रांतीची, विद्रोहाची बैठक देणाऱ्या या प्रतिभावंत, तेजस्वी साहित्यिक, कवीच्या नावाने मुक्त विद्यापीठाच्या वतीने दिला जाणारा एकमेव पुरस्कार सोडता नाशकात ना त्यांच्या नावाचा जागर होतो, ना त्यांच्या साहित्याला उजाळा मिळतो.