अजूनही परिस्थिती जैसे थे प्रश्न
By admin | Published: August 6, 2016 12:48 AM2016-08-06T00:48:15+5:302016-08-06T00:48:24+5:30
आरोग्याचा : तातडीने सफाई न झाल्यास साथीचे रोग बळावण्याची भीती
नाशिक : सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराला पुराचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसला असून अजूनही शहरातील परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. गुरुवारी (दि. ४) पावसाने विश्रांती घेतली असली तरी शुक्रवारी मात्र पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. शहरातील पंचवटी, सराफ बाजार, भांडी बाजार, गोदापार्क या परिसराचे गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अजूनही व्यावसायिकांचे जीवन पूर्वपदावर न आल्याचे चित्र शुक्रवारी बघायला मिळाले.
सराफ बाजारातील काही सराफांनी व्यवसायाला सुरुवात केली असली तरी दुकानांतील शोकेसमध्ये दागिने लावण्यात आलेले नाहीत, ग्राहकांचाही हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने छोट्या प्रमाणातच सराफ व्यावसायिक व्यवसाय करताना दिसत होते. अनेक सराफ दुकानांमध्ये अस्ताव्यस्त पडलेल्या फर्निचरची योग्य मांडणी सुरू होती तर काही दुकानांमध्ये पाण्याच्या साहाय्याने गाळ काढण्याचे काम शुक्रवारीही दिसत होते. दुकानदार आपल्या दुकानांमध्ये स्वच्छता करीत असले तरी दुकानातील गाळ तसेच साचलेला कचरा दुकाना बाहेर फेकत असल्याने या परिसराला उकिरड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सराफ बाजारातील रस्ते अरूंद असल्याने याठिकाणी जेसीबी किंवा तत्सम उपकरणांच्या साहाय्याने स्वच्छता करणे शक्य होत नसल्याने व्यावसायिकच याठिकाणी स्वच्छता करत आहेत.
सराफ बाजारापेक्षाही भांडीबाजार परिसराची वाईट अवस्था झाली असून अजूनही येथे गाळ तसाच साचला आहे. भांडी बाजारातील अनेक दुकानांमध्ये दुकानातील गाळ उपसण्याचे आणि दुकानातील भांडी स्वच्छ करण्याचे काम सुरूच आहे. या परिसरात कापड व्यावसायिकांची- देखील दुकाने असून पुराच्या पाण्यामुळे खराब झालेल्या कपड्यांचा खच दुकानांबाहेर पडल्याचे चित्र यावेळी बघायला मिळाले. पुराच्या पाण्यामुळे दुकानातील वस्तू खराब झाल्याने व्यावसायिकांकडून खराब झालेल्या वस्तूंची स्वस्तात विक्री सुरू असल्याने या वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांची याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. श्रावण महिन्यात केल्या जाणाऱ्या पूजा तसेच पुढील महिन्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून पूजेसाठी लागणारी भांडी, इतर उपकरणे यासह चौरंगाची खरेदी करताना ग्राहक दिसत होते. भांडी बाजारात टपऱ्या वाहून आल्याने तसेच मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नागरिकांना अरूंद वाटेतून चालणे मुश्कील झाले आहे. पोटरीपर्यंत साचलेल्या गाळातून कशीबशी वाट काढताना नागरिक दिसत होते. याठिकाणीही प्लॅस्टिक, पुठ्ठे आदि कचरा मोठ्या प्रमाणात साचल्याने परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. साथीचे रोग बळावण्याची शक्यता असल्याने स्वच्छता होणे आवश्यक असल्याचे मत व्यावसायिकांनी व्यक्त केले.