खासगी रुग्णालयाला वारेमाप रेमडेसिविरचा साठा; भुजबळ संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:14 AM2021-04-14T04:14:00+5:302021-04-14T04:14:00+5:30
अन्न व औषध प्रशासन विभागाकडून रेमडेसिविर इंजेक्शनचा सर्वच खासगी रुग्णालयांना समान साठा वाटप न करता एका खासगी हॉस्पिटलला एक ...
अन्न व औषध प्रशासन विभागाकडून रेमडेसिविर इंजेक्शनचा सर्वच खासगी रुग्णालयांना समान साठा वाटप न करता एका खासगी हॉस्पिटलला एक हजार इंजेक्शनचा पुरवठा केल्याची बाब पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या कानावर आली. त्यानंतर त्यांनी अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त दुष्यंत भामरे यांना बोलावून चांगलीच झाडाझडती घेतली. शहरात मोठ्या प्रमाणात आवश्यकता असताना व टंचाई असताना केवळ एकट्या हॉस्पिटलला एवढ्या मोठ्या संख्येने इंजेक्शनचा पुरवठा केल्याबाबत त्यांची कानउघाडणी केली. संतप्त झालेल्या भुजबळ यांनी वैद्यकीय शिक्षण आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय यांच्याशी संपर्क करून जिल्ह्यातील सदर गंभीर प्रकाराबाबत माहिती देऊन नाशिक जिल्ह्यातील रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले. भुजबळांच्या रुद्रावतारानंतर औषध उत्पादक कंपनीच्या प्रशासनाने संपर्क करून बुधवारी सात हजार रेमडेसिविरचा साठा देण्यात येईल आणि हे औषध जिल्हा प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे वितरित करण्याची ग्वाही दिली.