अर्धाच दिवस पुरला लसींचा साठा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:15 AM2021-05-07T04:15:56+5:302021-05-07T04:15:56+5:30
नाशिक : शहरातील २२ केंद्रांवर गुरुवारी लसीकरणाला प्रारंभ झाला. त्यातील बहुतांश केंद्रांवर काेविशिल्ड लसींचा साठा संपुष्टात आल्याने त्या केंद्रांवरील ...
नाशिक : शहरातील २२ केंद्रांवर गुरुवारी लसीकरणाला प्रारंभ झाला. त्यातील बहुतांश केंद्रांवर काेविशिल्ड लसींचा साठा संपुष्टात आल्याने त्या केंद्रांवरील लसीकरण प्रक्रिया थांबविण्यात आली. त्यामुळे दुपारी दोनपूर्वीच अनेक केंद्रांवर लसीकरणाचा साठा संपुष्टात आला असून शुक्रवारी कोविशिल्ड लस कधी उपलब्ध होणार त्यावर महापालिका क्षेत्रातील पुढील लसीकरणाचे नियोजन निश्चित केले जाणार आहे.
शहराला उपलब्ध झालेला ८५०० लसींचा कोविशिल्डचा साठा अवघ्या तीन दिवसातच संपुष्टात आला आहे. गुरुवारी १७ केंद्रांवर ४५ पुढील वयोगटासाठी कोविशिल्ड तर २ केंद्रांवर ४५ वर्षांआतील सज्ञान नागरिकांसाठीच्या लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तर केवळ ३ केंद्रांवर ४५ आतील वयोगटासाठी कोवॅक्सिन उपलब्ध करून देण्यात आले होते. आता केवळ काही केंद्रांवर अल्प प्रमाणात कोविशिल्ड उपलब्ध असल्याने तिथेदेखील शुक्रवारी लसीकरण सुरू करता येण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे शुक्रवारी लसींचा साठा किती आणि कधी मिळतो, त्यावरच शहरातील सर्व केंद्रांवरील पुढील नियोजन करण्यात येणार आहे. दरम्यान कोवॅक्सिन लसींचा साठा काही प्रमाणात उपलब्ध असल्याने शहरातील सातपूरचे आणि पंचवटीचे मायको रुग्णालय तसेच सिडकोतील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रातच लस उपलब्ध राहणार असल्याचे महापालिकेच्या लसीकरण प्रमुख डॉ. अजिता साळुंके यांनी सांगितले.