चोरीच्या १४ दुचाकी जप्त
By admin | Published: July 26, 2014 12:12 AM2014-07-26T00:12:06+5:302014-07-26T00:54:54+5:30
दोघांना अटक : पंचवटी पोलिसांची कारवाई
पंचवटी : परिसरातून दिवसा व रात्रीच्या सुमाराला इमारतीच्या वाहनतळातून तसेच रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकी बनावट चावीच्या सहाय्याने तसेच हॅँडल लॉक तोडून चोरी करणाऱ्या दोघा संशयितांना पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. या दोघा भामट्यांकडून तब्बल सात लाख रुपये किमतीच्या १४ दुचाकी जप्त केल्या आहेत.
पोलिसांनी अटक केलेले दोघेही संशयित हे कोपरगाव येथील असून, त्यांनी यापूर्वीही अनेक दुचाकी चोरल्या असण्याची शक्यता व्यक्तकेली आहे. पोलिसांनी या संशयितांनी शिर्डी, कोपरगाव तसेच अन्य भागांत चोरून नेलेल्या दुचाकी जप्त केल्या आहेत. यात तीन बुलेट, दोन पल्सर, यामाहा आरवन फाईव्ह, चार स्प्लेंडर, चार बजाज तसेच अन्य कंपनीच्या जवळपास एकूण १४ दुचाकी आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कोपरगाव येथील अमोल लक्ष्मण पारे व शिर्डीतील गणेश नंदकिशोर अहेर या दोघांना अटक केली आहे. दोघांनीही पंचवटीतून अन्य सहकाऱ्यांच्या सहाय्याने या दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे.
हे दोघे पंचवटीत दुचाकी चोरीसाठी येणार असल्याचे कळल्याने पोलिसांनी सापळा रचला व दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली. संशयितांनी चोरी केलेल्या वाहनांचे सुटे भाग बदलणे तसेच नंबर क्रमांकात खाडाखोड करून त्या वापरात आणल्या होत्या. या संशयितांनी शहरातही दुचाकी चोरी केल्याची शक्यता असून, त्याबाबत माहिती जमा करण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस उपआयुक्त अविनाश बारगळ, सहाय्यक पोलीस आयुक्तरवींद्र वाडेकर यांनी दिली. पोलीस निरीक्षक शांताराम अवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे विजय गवांदे, संजय पवार, भगीरथ नाईक, येवाजी महाले, राजू राऊत, विजय वरंदळ, मुन्ना वाघमारे, लोखंडे, कोकाटे आदिंनी ही कारवाई केली आहे. (वार्ताहर)