चोरीचे बैल सापडले; खुन्यांचा तपास लागेना
By admin | Published: September 12, 2014 12:48 AM2014-09-12T00:48:23+5:302014-09-13T00:55:13+5:30
चोरीचे बैल सापडले; खुन्यांचा तपास लागेना
मालेगाव : शहरालगतच्या वडगाव शिवारात सालदाराचा खून करून लंपास करण्यात आलेली बैलजोडी कॅम्प रस्त्यालगत सापडली. मात्र या जनावरचोर व खून करून फरार झालेल्या आरोपींचा तपास करण्यात अद्याप पोलीस प्रशासनास यश आलेले नाही.
गेल्या काही महिन्यांमध्ये शहर - तालुक्यातूनच नव्हे तर संपूर्ण कसमादे पट्ट्यातूनच शेतोपयोगी जनावरांची चोरी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे आधीच त्रस्त असलेला शेतकरी पूर्णपणे वैतागलेला आहे. आता तर जनावरांची चोरी करण्यासाठी शेतकऱ्यांचेच खून होत असल्यामुळे शहर - तालुका व कसमादे भागातील पशुपालक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे, असे असताना पोलीस प्रशासन मात्र हातावर हात ठेवून गप्प असून, शेतोपयोगी जनावरांची चोरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरले आहे. मंगळवारी रात्री आठ ते पहाटे सहादरम्यान शहरालगतच्या वडगाव शिवारात हरिलाल अस्मर यांच्या शेतात जनावरांच्या गोठ्यात खाटेवर झोपलेल्या कोळजी चव्हाण (७०) वर्षीय वृद्ध सालदाराच्या अज्ञात चोरट्यांनी फावड्याच्या दांड्याने खून केला. त्यानंतर त्यांनी मोठ्या शिताफीने कुणाला चाहुल लागू न देता ७० हजार रुपये किमतीची खिल्लारी बैलजोडी चोरून नेली. त्यामुळे सदर खून हा उघड उघड जनावरांच्या चोरीसाठी असल्याचे स्पष्ट आहे.
यासंदर्भात जिल्हा पोलीसप्रमुख संजय मोहिते यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी त्यांच्याकडे तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. दोन महिन्यांपासून परिसरात जनावरांच्या चोऱ्या मोठ्या प्रमाणात होत असल्याची तक्रार त्यांनी त्यांच्याकडे केली होती. तसेच स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीविषयीदेखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शहर - तालुक्यासह कसमादे भागातील शेतकऱ्यांमध्ये व शेतमळ्यांमध्ये राहणाऱ्या तसेच राखणदारीची जबाबदारी असणाऱ्या सालदार - मजूर वर्गामध्ये जनावरे चोर व खुनी टोळीची भीती निर्माण झाली आहे. सतत शेतोपयोगी जनावरे चोरी जाण्याच्या घटनेमुळे ग्रामीण भागातील शेतीव्यवसाय व एकूण कृषी अर्थव्यवस्थेवर त्याचा झालेला दुष्परिणाम आता दिसू लागला
आहे.