महिलेने पिटाळलेल्या ‘त्या’ चोरट्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 12:50 AM2019-06-01T00:50:02+5:302019-06-01T00:50:37+5:30
अशोकनगर येथील स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात चाकू घेऊन घुसलेल्या चोरट्याच्या धाकाला बळी न पडता सविता मुर्तडक या कर्मचारी महिलेने त्यालाच हिसका दाखवला आणि त्याला पळवून लावले. केंद्रातील एक लाख रूपयांपैकी ४० हजारांची रक्कम घेऊन पळालेल्या या चोरट्याला अखेरीस पंधरा दिवसांनी पोलीसांनी जेरबंद केले.
सातपूर : अशोकनगर येथील स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात चाकू घेऊन घुसलेल्या चोरट्याच्या धाकाला बळी न पडता सविता मुर्तडक या कर्मचारी महिलेने त्यालाच हिसका दाखवला आणि त्याला पळवून लावले. केंद्रातील एक लाख रूपयांपैकी ४० हजारांची रक्कम घेऊन पळालेल्या या चोरट्याला अखेरीस पंधरा दिवसांनी पोलीसांनी जेरबंद केले. आरोपी संग्राम पारसमल पारख (२८) याच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून, संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
चोरट्याने धाक दाखवून लुटीचा केलेला प्रयत्न आणि त्यानंतर तीने जीवाची बाजी लावून दाखवलेले धाडस याचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला असून, या रणरागिणीचा पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सत्कार केला आहे. अशोकनगर येथील स्टेट बँकेशेजारी कोठावदे किराणा सेंटरच्यावर स्टेट बँकेचे ग्राहक सेवा केंद्र्र आहे. या ठिकाणी १७ मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या सविता मुर्तडक या एकट्याच कर्मचारी असताना एक चोरटा याठिकाणी आला. त्याने चाकूचा धाक दाखवून लूट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सविता मुर्तडक या महिलेने त्याचा प्रतिकार केला आणि त्याला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. त्या चोरट्याला जमिनीवर पाडून त्यांनी इंगा दाखवला. मात्र तरीही चोरटाने गल्ल्यातील एक लाख रुपयांपैकी ४० हजार रुपयांची लूट करून पलायन केले.
चोरट्याशी दोन हात करताना मुर्तडक यांनी जिवाची पर्वा न करता रुद्रावतार धारण करून चोरट्याचा प्रखर प्रतिकार केला. मात्र चोरटा काही रक्कम घेऊन फरार झाला.
याबाबत सविता मुर्तडक यांनी सातपूर पोलिसांत अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती. याबाबत सातपूर पोलीस आणि गुन्हे शाखेचे पोलिसांनी तपास करून बुधवारी (दि.२९) गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांना श्रमिकनगर येथील देशीदारू दुकानात संशयित आरोपी संग्राम पारसमल येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून राधाकृष्णनगर, गोसावी अपार्टमेंट येथील सागर मुर्तडक यांच्या घरातील भाडेकरी संग्राम पारसमल पारख (२८) यास दुचाकीसह चौकशीसाठी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर गुन्हेशाखेने आरोपीला सातपूर पोलिसांच्या ठाण्यात प्र्रत्यार्पित करण्यात आले असून, सातपूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर पोलीस आयुक्त नांगरे-पाटील यांनी मुर्तडक यांचा सत्कार करून धाडसाचे कौतुक केले आहे.
सर्वसामान्यांचे असलेले पैसे वाचविणे हा एकच विचार समोर आला आणि त्या चोरट्याशी दोन हात करण्याचे बळ आले. धीर एकवटून चोरट्याचा सामना केला. त्यावेळी सर्वसामान्य ठेवीदारांचाच विचार डोक्यात होता. त्यामुळे चाकूचीही भीती न वाटता चोरट्याशी लढले.
- सविता मुर्तडक