चालत्या कारने घेतला पेट
By Admin | Published: August 5, 2016 01:54 AM2016-08-05T01:54:21+5:302016-08-05T01:58:30+5:30
चालत्या कारने घेतला पेट
सिडको : समांतर रस्त्यावरून पाथर्डी फाट्याकडे जाणाऱ्या एका इंडिगो कारने अचानक पेट घेतला. वाहनाच्या इंजिनमधून ज्वाला अन् धूर दिसू लागताच वाहनचालकाने कार रस्त्यालगत थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र कार थांबत नसल्याने वेग कमी करून चालकाने बाहेर उडी घेतली. पेट घेतलेली कार उतारावरून मागे येताना एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनावर आदळली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, इंडिगो माझा कार (एमएच १५, सीटी ७५४९) ही पाथर्डी फाट्याकडे जात असताना अचानकपणे पेटली. कारचालक संदीप माथूर (४९, राणेनगर) यांनी तत्काळ कारमधून बाहेर उडी घेतली; मात्र कार उतारावरून मागे आल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बसवर (एमएच १५, एके १०३७) आदळली. बसचालक दिलीप सोनवणे यांनी प्रसंगावधान राखून मागील वाहनांचा अंदाज आरशांमधून घेतला आणि तत्काळ वेगाने बस मागे नेली. यामध्ये बसचे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी सर्व विद्यार्थी सुखरूप असल्याने अनर्थ टळला. (वार्ताहर)