महाजे येथे सरपंच निवडणुकीत दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 12:49 AM2021-02-16T00:49:14+5:302021-02-16T00:49:39+5:30
दिंडोरी : तालुक्यातील सरपंच-उपसरपंच निवडणुकीला गालबोट लागले असून महाजे येथे सरपंचपदाच्या महिला उमेदवारावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली असून पोलिसांनी वेळीच धाव घेत सदर महिला सरपंचाचा जीव वाचवत पुढील अनर्थ टळला. मात्र, विरोधी गटाच्या दगडफेकीत सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह पाच पोलीस व काही ग्रामस्थ जखमी झाले आहे.
दिंडोरी : तालुक्यातील सरपंच-उपसरपंच निवडणुकीला गालबोट लागले असून महाजे येथे सरपंचपदाच्या महिला उमेदवारावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली असून पोलिसांनी वेळीच धाव घेत सदर महिला सरपंचाचा जीव वाचवत पुढील अनर्थ टळला. मात्र, विरोधी गटाच्या दगडफेकीत सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह पाच पोलीस व काही ग्रामस्थ जखमी झाले आहे. दरम्यान, कडक पोलीस बंदोबस्तात निवडणूक प्रक्रिया पार पडत सरपंचपदी रुपाली सोमनाथ भोये तर उपसरपंचपदी कविता ज्ञानेश्वर इंगळे यांची निवड झाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिंडोरी तालुक्यातील महाजे ग्रुपग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच निवडणुकीसाठी तहसीलदार पंकज पवार यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी भोये यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली.
महाजे येथील ग्रुप ग्रामपंचायतींतर्गत सादराळे व शृंगारपाडा येथील सदस्यांचे बहुमत असल्याने येथील सरपंच, उपसरपंच निवड होण्याची शक्यता होती. त्यास महाजे येथील सदस्य व काही ग्रामस्थांचा विरोध होता. येथे वाद होण्याची कुणकुण पोलीस प्रशासनाला लागल्याने वाढीव पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सादराळे व शृंगारपाडा येथील सदस्य निवडणूक प्रक्रियेस आले असता त्यांना अडवत प्रक्रियेसाठी जाण्यापासून रोखण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात जमल्या होत्या. त्यांनी सदर सदस्यांना अडविण्याचा प्रयत्न केला काही ग्रामस्थांनी दगडफेक केली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत सदस्यांना ग्रामपंचायत कार्यालयात हलविले, मात्र, या गोंधळात काही महिलांनी सरपंचपदाच्या उमेदवार रुपाली भोये यांना रोखत त्यांच्यावर हल्ला केला. तसेच साडीने गळा आवळण्याचा प्रकार झाला. एका वृद्ध महिलेलाही मारहाण झाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, हवालदार पजई, युवराज खांडवी आदी पोलिसांनी धाव घेत सदर महिलेची सुखरूप सुटका केली.
यावेळी चव्हाण, खांडवी, पजई यांच्यासह पाच पोलीस जखमी झाले. पोलिसांनी जमावाला आटोक्यात आणत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त बोलावत निवडणूक प्रक्रिया विहीत वेळेत पार पडली. या प्रकारानंतर पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून गावात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांचे मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.