नाशिक जिल्हा बॅँकेच्या भगूर शाखेत पैसे वाटप बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 06:26 PM2019-01-03T18:26:57+5:302019-01-03T18:27:28+5:30
लोकमत न्युज नेटवर्क नाशिक : येथील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतून गेल्या एक महिन्यापासून खातेदारांना पैसे देण्याचे बंद ...
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक: येथील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतून गेल्या एक महिन्यापासून खातेदारांना पैसे देण्याचे बंद करण्यात आले असून, त्यामुळे परिसरातील खातेधारकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. एवढेच नव्हे तर ठेवींची मुदत संपल्यानंतरही त्याची रक्कम देण्याऐवजी त्या ठेवी पुन्हा नूतनीकरण करण्याचा आग्रह बॅँकेच्या अधिकाऱ्यांकडून धरला जात आहे.
नोटाबंदीनंतर जिल्हा बॅँकेच्या भगूर शाखेतून खातेदारांना मोठी रक्कम मिळत नसली तरी, दोन ते तीन हजार रुपये बॅँकेतून काढता येत असल्याने खातेदारांची फारशी ओरड नसली तरी, गेल्या एक महिन्यापासून बॅँकेने आता तेवढीही रक्कम देणे बंद करून टाकत, पैशांसाठी नाशिकच्या मुख्यालयात जाण्याचा सल्ला दिला जात आहे. या संदर्भात खातेदार अंबादास जिवराम आडके यांनी त्यांच्या पन्नास हजार रुपयांच्या ठेवीची मुदत संपुष्टात आल्याने बॅँकेकडे पैसे परतीची मागणी केली असता, शाखा प्रबंधक ए. बी. पानसरे यांनी त्यांना पैसे शिल्लक नसल्याचे कारण देत मुदत ठेवीचे नूतनीकरण करण्याचा सल्ला दिला. पैसे हवेच असतील तर बॅँकेच्या मुख्य कार्यालयाकडे मागणी करा, असे सांगितले. त्यावर आडके यांनी त्यांच्याकडे लेखी देण्याची मागणी केली व चुकीच्या पद्धतीने बॅँकेने कर्ज वाटप केले व ते वसूल होत नसल्याने त्याचा खातेदारांना त्रास का असा सवाल केला. अखेर वाद वाढू लागल्याचे पाहून प्रबंधक पानसरे यांनी २५, २५ हजाराचे दोन चेक देऊन आरटीजीएस केले व पैसे नंतर खात्यात वर्ग होणार असे सांगितले.
दरम्यान या संदर्भात शाखा प्रबंधक ए. बी. पानसरे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, कर्जदाराकडून कर्ज वसुलीचा विशेष प्रयत्न सुरू असून, बँकेच्या मुख्य शाखेत पैसे वाटप चालू असते. सध्या पैशांच्या कमतरतेमुळे भगूर शाखेतून पैसे वाटप बंद करण्यात आले आहे. एक महिन्यापासून ग्राहकांचा वीज बिल भरणा शाखेत स्वीकारला जात आहे.