वीज, कांदाप्रश्नी रास्ता रोको
By admin | Published: March 7, 2017 12:58 AM2017-03-07T00:58:40+5:302017-03-07T00:58:50+5:30
देवळा : कांदा विक्र ीचे पैसे शेतकऱ्यांना धनादेशाद्वारे न देता रोख स्वरूपात द्यावेत या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
देवळा : अखंडित व उच्च दाबाने वीजपुरवठा सुरू करावा तसेच कांदा विक्र ीचे पैसे शेतकऱ्यांना धनादेशाद्वारे न देता रोख स्वरूपात द्यावेत किंवा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावेत या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी (दि. ६) सकाळी देवळा येथील पाचकंदील चौकात अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात माळवाडी व सटवाईवाडी येथील शेतकऱ्यांनी सहभागी होत वीज वितरण कंपनीविरोधात संताप व्यक्त केला. वीज कंपनीने त्वरित रोहित्राची दुरुस्ती करून बुधवारपासून सहा तास विनाखंडित व उच्च दाबाने वीजपुरवठा केला जाईल, असे आश्वासन कंपनीचे कार्यकारी अभियंता एम.एम. गोपुलवाड यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
देवळा येथील पाचकंदील चौकात सकाळी साडेअकरा वाजता विंचूर - प्रकाशा मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. वीज कंपनीकडून वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतातील पिकांना पाणी देणे दुरापास्त झाले आहे. अनियमित व कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने वीजपंप नादुरुस्त होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. चालूवर्षी सर्वत्र उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आलेली आहे. विजेच्या समस्येमुळे पाणी असूनही पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. जिल्हा परिषद सदस्य नूतन अहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंडित निकम, रायुकाँचे तालुकाध्यक्ष सुनील अहेर, उपनगराध्यक्ष लक्ष्मीकांत अहेर, नगरसेवक जितेंद्र अहेर, संजय गिते, बाजार समितीचे सचिव दौलतराव शिंदे, उमेश अहेर, नीलिमा अहेर, पंडित मेधने, मुन्ना आहिरराव, बंडू अहेर, रामचंद्र शेळके, आप्पा अहेर, रामदास अहेर, धना अहेर, मोहन देवरे, जगन मेधने, शांताराम बागुल, दादाजी बागुल, भालचंद्र मेधने, ललित निकम, दशरथ पूरकर आदिंसह शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. (वार्ताहर)