पळसे येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको
By admin | Published: June 5, 2017 12:44 AM2017-06-05T00:44:56+5:302017-06-05T00:46:21+5:30
नाशिकरोड : पळसे येथील शेतकऱ्यांनी आंदोलन अधिक तीव्र केले. रविवारी सकाळी शेतकऱ्यांनी पळसे येथे नाशिक-पुणेरोड महामार्ग रोखून रस्त्यावर भाजीपाला फेकून दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : संपावर असलेल्या पळसे येथील शेतकऱ्यांनी आंदोलन अधिक तीव्र केले. रविवारी सकाळी शेतकऱ्यांनी पळसे येथे नाशिक-पुणेरोड महामार्ग रोखून रस्त्यावर भाजीपाला फेकून दिला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या निषेधार्थ घोेषणाबाजी करण्यात आली.
रविवारी सकाळी सुमारे तीनशे ते चारशे शेतकरी अचानक नाशिक-पुणे महामार्गावर जमा झाले व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत या शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला. आंदोलक शेतकऱ्यांनी कांदा व इतर भाजीपाल्यासह दूध महामार्गावर ओतून दिले. या प्रकारामुळे सुमारे अर्धातासभर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. महामार्गावर दोन्हीही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या आंदोलनाची माहिती नाशिकरोड पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरज बिजली, पोलीस उपनिरीक्षक भीमराज गायकवाड आदींचे पथक पळसे येथे पोहचताच आंदोलनकर्ते शेतकरी महामार्गावरून दूर झाले.
घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या पळसे येथे पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखून सरकारच्याच विरोधात घोषणाबाजी केली. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख जगन्नाथ आगळे यांच्यासह माजी सरपंच नवनाथ गायधनी, सरपंच देवीदास गायधनी, गणपत गायधनी, बालाजी एखंडे, रामकृष्ण गायखे, संजय गायधनी, शिवाजी गायखे, प्रमोद गायधनी, दिनकर गायधनी, वसंत गायधनी, मनसेचे सुनील गायधनी, अनिल गायधनी, नामदेव आगळे, ज्ञानेश्वर गायधनी आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.पळसे येथे शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध नोंदविला.