घरातच थांबा अन्यथा..., पोलीस अधिक्षक आरती सिंह यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 02:29 PM2020-03-30T14:29:57+5:302020-03-30T14:35:13+5:30
केवळ दूध, भाजीपाला, औषधे, वृत्तपत्रे आदींची वाहतूक करणाऱ्या वाहनांना संचारबंदीचे नियम शिथील करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त अत्यावश्यक व अपात्कालीन सेवेतील वाहनेही वगळण्यात आली आहे;
नाशिक : ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात नव्हे तर देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात एक कोरोना बाधित रु ग्ण आढळून आल्याने आता गावागावांत संचारबंदी अधिक कडक केली जाणार जाणार आहे, अशी माहिती जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी दिली. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अथवा वाहने वगळता कोणीही रस्त्यावर आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नाशिकमध्ये अद्याप एकही रुग्ण आढळून आला नव्हता मात्र रविवारी उशिरा अचानकपणे एक रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे त्यामुळे प्रशासनाने अधिक सतर्क होत संचारबंदी, साथरोग प्रतिबंधक कायदा अंमलात आणण्यासाठी कंबर कसली आहे. कोरोना आजार अधिक पसरू नये, यासाठी नागरिकांनी आपआपल्या घरांमधून बाहेर पडणे टाळावे, विनाकारण जर कोणी घराबाहेर आल्यास त्यांच्यावर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. जिल्ह्यातील कुठल्याही गावांमध्ये कोणी परदेशवारीवरून आले असेल तर त्याची माहिती तत्काळ जिल्हा ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्ष किंवा आरोग्य विभागाला द्यावी असेही आवाहन सिंह यांनी केले आहे. जिल्ह्याती संचारबंदी कायद्याचे उल्लंघन आता कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही.
जिल्ह्याच्या सर्व सीमावर्ती नाक्यांवर तैनात अधिकारी व कर्मचारी यांना प्रत्येक वाहन तपासण्याचे आदेश दिले गेले आहेत. केवळ दूध, भाजीपाला, औषधे, वृत्तपत्रे आदींची वाहतूक करणाऱ्या वाहनांना संचारबंदीचे नियम शिथील करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त अत्यावश्यक व अपात्कालीन सेवेतील वाहनेही वगळण्यात आली आहे; मात्र अन्य कोणतेही वाहन रस्त्यावर आल्यास त्याची तपासणी करून वाहनमालक-चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेशही बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सिंह यांनी दिले आहे. जिल्ह्यातील कुठल्याही तालुक्यांमध्ये कोणत्याही कारणास्तव नागरिक गर्दी करणार नाही याबाबत अपर पोलीस अधिक्षकांसह सर्वच पोलीस ठाण्यांच्या निरिक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी आपल्या घरातच थांबून कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाला मदत करायची आहे असेही सिंह म्हणाल्या.