नांदगावी महानगरी एक्सप्रेसला ६ सप्टेंबरपासून थांबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 05:12 PM2018-09-01T17:12:05+5:302018-09-01T17:12:30+5:30
प्रतीक्षा संपली : गाडीच्या स्वागताची तयारी सुरू
नांदगाव : येत्या ६ सप्टेंबरपासून वाराणसी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणारी महानगरी एक्सप्रेस नांदगाव रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. सुरूवातीला सहा महिन्यांसाठी हा थांबा प्रायोगिक तत्वावर मंजूर झाला आहे.
सकाळी ६ वाजेपासून ११ वाजेच्या दरम्यान मुंबई-नाशिककडे जाण्यासाठी एकही गाडी नसल्याने महानगरीचा थांबा मिळण्याची गेल्या दहा वर्षांपासूनची प्रवाशांची दीर्घकालीन मागणी यानिमित्ताने पूर्ण झाली आहे. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी याबाबत रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता तर गेली अनेक वर्षे कामयानी महानगरी व हुतात्मा एक्सप्रेस या गाड्यांचे थांबे मंजूर करावेत यासाठी रेल्वे कृती समितीचे निमंत्रक सुमित सोनवणे यांच्यासह विविध पातळीवर जनतेच्या मागणीचा रेटा होता. रेल्वे प्रशासनाने आर्थिक उत्पन्न मिळत नाही म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले होते. कामयानी एक्सप्रेससाठी तर रेल्वे रोको सारखी आंदोलने झाली होती. त्यामुळे २८ फेब्रुवारी २०१४ पासून कामयानी एक्सप्रेस नांदगाव स्थानकावर थांबत आहे.आता येत्या ६ सप्टेंबरपासून नांदगावला महानगरी एक्सप्रेसचा प्रायोगिक तत्त्वावरचा थांबा मंजूर झाला आहे. दरम्यान महानगरी एक्सप्रेसचा मंजूर करण्यात आलेला थांबा प्रायोगिक तत्वावर असून नांदगाव स्थानकातून या गाडीसाठी तिकीटविक्र ीतून मिळणारे उत्पन्न बघून थांबा नियमित केला जाणार आहे. महानगरी एक्सप्रेसच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.
इन्फो
हुतात्मा एक्सप्रेसचीही मागणी
यापुढे पुणे भुसावळ दरम्यान धावणाऱ्या हुतात्मा एक्सप्रेसच्या मंजुरी साठी अधिक प्रयत्न करावेत,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, खासदार हरिश्चंद्र चव्हाण स्वत: महानगरी एक्सप्रेस गाडीला हिरवा झेंडा दाखविणार असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड यांनी दिली.