चांदवड, सटाण्यात रास्ता रोको

By admin | Published: December 21, 2016 11:48 PM2016-12-21T23:48:38+5:302016-12-21T23:49:02+5:30

कांदा गडगडला : शेतकरी संतप्त; वाहतूक ठप्प; प्रवाशांचे हाल

Stop the path in Chandwad, Chowk | चांदवड, सटाण्यात रास्ता रोको

चांदवड, सटाण्यात रास्ता रोको

Next

सटाणा/चांदवड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत्यांमध्ये   कांद्याचे भाव एकाच दिवशी तब्बल तीनशे ते साडेतीनशे रु पयांनी कोसळल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अचानक रास्ता रोको करत विंचूर-प्रकाशा राज्यमार्ग तासभर रोखून धरला. अचानक झालेल्या या रास्ता रोकोमुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली.  दुसरीकडे सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास चांदवड येथेही  संतप्त शेतकऱ्यांनी पेट्रोलपंप चौफुलीजवळ अचानक रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी शासनाविरुद्ध घोषणा दिल्या, तर रस्त्यावर ठाण मांडत दोन्ही बाजूंची वाहतूक अडविली.  बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा शेतमालाचे लिलाव सुरू झाले. सकाळी कांद्याला अवघा ३०० रुपये ते ६०० रुपये असा सरासरी भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पेट्रोलपंप चौफुलीवर जाण्याचा निर्णय घेतला. घटनेची माहिती मिळताच माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, कृउबाचे संचालक संजय जाधव, मजूर संस्थेचे संचालक शिवाजी कासव, समाधान जामदार, शांताराम घुले व शेतकरी चौफुलीवर आले. त्यांच्या पाठोपाठ चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन अहेर हेही रास्ता रोको आंदोलनात सामील झाले.  रास्ता रोकोचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र भारती, पोलीस उपनिरीक्षक कैलास चौधरी व पोलीस कर्मचारी चौफुलीवर दाखल झाले. चांदवडचे तहसीलदार शरद मंडलिक हेही घटनास्थळी आले. त्यांना शेतकऱ्यांच्या वतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी निवेदन दिले व येत्या आठ दिवसात सुधारणा करावी, अशी मागणी केली.  याप्रसंगी शेतकरी काही करून ऐकत नव्हते यावेळी माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चा इतकासुद्धा भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. याकडे राज्य व केंद्र शासनाने लक्ष देणे गरजेचे असताना शासन शेतकऱ्यांना सापत्नभावाची वागणूक देत असल्याचा आरोप करून गेल्या वेळी शेतकऱ्यांना एक रुपयाही भरपाई मिळाली नाही याकडे तातडीने येत्या आठ दिवसात लक्ष द्यावे, अशी मागणी कोतवाल यांनी केली. यावेळी कृउबाचे संचालक संजय जाधव, शिवाजी कासव, शेतकऱ्यांची भाषणे झाली, तर सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी, चांदवड तालुक्यामध्ये मुख्य पीक कांदा असून, मोठे उत्पादन झाले मात्र यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केंद्राकडे शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी चर्चा केली असून, आज दुपारपर्यंत निर्णय होईल, असे सांगितले. उपसभापती नितीन अहेर यांनी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान व कृषिमंत्र्यांची भेट घेऊन कांदाप्रश्नी गाऱ्हाणे मांडले. दरम्यान, संतप्त शेतकऱ्यांनी बाजार आवारांवर कांदा शेतमालाच्या आवकेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे गेल्या सप्ताहापासून दैनंदिन बाजारभावात घसरण होत आहे. शेतकरीवर्गास कांदा लागवडीपासून ते काढणीपर्यंतच्या खर्चाचा विचार करता बाजारपेठेत मिळणाऱ्या बाजारभावात कांदा विक्री करणे न परवडणारे आहे. कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झालेले असून, सदरचा कांदा काढणीनंतर लगेच विक्री करावा लागत असल्याने बाजार समितीच्या बाजार आवारावर मोठ्या प्रमाणावर आवकेत वाढ झालेली आहे. तसेच शेतकऱ्यांनी कांदा उत्पादनासाठी केलेला खर्च, सरकारी निमसरकारी संस्थांकडून व बॅँकांकडून घेतलेले कर्ज आणि त्याची परतफेड करणे त्यांना शक्य होणार नसल्याने येथील शेतकऱ्यांना आत्महत्त्येशिवाय पर्याय राहणार नाही तरी शासनाने कांदा बाजारभावात सुधारणा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी झालेल्या रास्ता रोको आंदोलनात बापू शिंदे, राहुल कोतवाल, सचिन शिंदे, शांताराम घुले, सुभाष भांबर, नितीन थोरे, प्रभाकर ठाकरे, नंदकुमार कोतवाल, समाधान जामदार आदिंसह कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सटाण्यात मंगळवारी (दि. २०) कांद्याला सरासरी ८०० रु पये क्विंटल भाव मिळाला. मात्र आज झालेल्या कांद्याच्या लिलावात प्रतिक्विंटल तब्बल तीनशे ते साडेतीनशे रु पयांची घसरण झाली. त्यामुळे संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दुपारी १ वाजेच्या सुमारास अचानक विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर कांद्याने भरलेली वाहने आडवी लावून रास्ता रोको आंदोलन सुरू केले. सटाणा बाजार समितीचे कांदा लिलाव मागील पंधरा दिवसांपासून विंचूर-प्रकाशा राज्यमार्गालगतच्या नवीन जागेवर स्थलांतरित करण्यात आले आहेत. तासभर सुरू राहिलेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे राज्यमार्गावर दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. नायब तहसीलदार आबासाहेब तांबे, पोलीस निरीक्षक बशीर शेख, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेत शेतकऱ्यांना शांततेचे आवाहन केले. (लोकमत ब्युरो)







 

Web Title: Stop the path in Chandwad, Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.