नो पार्किंगमध्येच रिक्षा थांबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:25 AM2021-03-13T04:25:37+5:302021-03-13T04:25:37+5:30
जुने नाशिकमध्ये सोशल डिस्टन्सचा फज्जा नाशिक : जुने नाशिक परिसरातील भद्रकाली, दूधबाजार, कथडा आदी भागात असलेल्या बाजारपेठेत सोशल डिस्टन्स ...
जुने नाशिकमध्ये सोशल डिस्टन्सचा फज्जा
नाशिक : जुने नाशिक परिसरातील भद्रकाली, दूधबाजार, कथडा आदी भागात असलेल्या बाजारपेठेत सोशल डिस्टन्स नियमांचा फज्जा उडाला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाही या भागात नागरिकांकडून कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचे दिसून आले. चौकाचौकात आणि दुकानांमध्ये गर्दी होत असल्याने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने निर्बंध पाळणे गरजेचे झाले आहे.
रिक्षांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक
नाशिक : शहरावर काेरोनाचे सावट अधिक गडद होत असतानाही रिक्षामधून जादा क्षमतेने प्रवासी वाहतूक केली जात आहे. रिक्षाचालकांना रिक्षा चालविण्यासाठीची परवानगी देण्यात आलेली असली तरी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याची त्यांना सक्ती करण्यात आलेली आहे. मात्र त्याबाबतची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
निर्बंधांबाबत दुकानदार अजूनही संभ्रमात
नाशिक : शहरात सकाळी सात ते सायंकाळी सात या दरम्यान दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. हॉटेल्स, बार यांना रात्री नऊ वाजेपर्यंत परवानगी आहे. या निर्बधांचा अर्थ व्यावसायिक आपापल्या परीने लावत आहेत. त्यामुळे सायंकाळी सात वाजल्यानंतरही हातगाडीवरील खाद्यपदार्थ, चहावाले, मिठाईची दुकाने सुरू असल्याचे दिसून आले. खाद्यपदार्थ असल्याने हॉटेल नियम लागू होत असल्याचा युक्तिवाद दुकानदार करीत आहेत.
खोडदेनगर मार्गावर जेसीने खोदकाम
नाशिक : उपनगर येथील खोडदेनगरकडे जाणाऱ्या मार्गावर जेसीबीच्या साह्याने खोदकाम केले जात आहे. शहरात विविध ठिकाणी रस्ते अडवून खोदकाम सुरू असल्याने वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झालेला आहे. भररहदारीच्या मार्गावर खोदकाम करण्यात येत असताना आता अंतर्गत कॉलनी परिसरातही खोदकाम होत असल्याने रहिवाशांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
गोल्फ क्लबच्या भिंतींलगत झोपड्या
नाशिक : ईदगाह मैदानाच्या प्रवेशद्वारालगत असलेल्या काही झोपड्या आता गोल्फ क्लब मैदानाच्या संरक्षण भिंतीचा आधार घेऊन उभ्या राहू लागल्या आहेत. या परिसरात आंदोलकांना निदर्शनांसाठी जागा देण्यात आलेली आहे. शहरासह मैदानाचे सुशोभिकरण होत असताना वेळीच अशा प्रकारच्या अतिक्रमणाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.