नांदगावी रास्ता रोको

By admin | Published: November 17, 2016 11:57 PM2016-11-17T23:57:21+5:302016-11-17T23:59:27+5:30

संताप : भाजीपाला लिलावावरून शेतकऱ्यांचा उद्रेक

Stop the road to Nandagavi | नांदगावी रास्ता रोको

नांदगावी रास्ता रोको

Next

नांदगाव : भाजीपाला लिलाव गुरुवारी सकाळी बंद पडून रास्ता रोको करण्यात आला. तीन दिवस बाजार बंद होता. बंदची नोटीस नाही व सुरू करण्याची माहिती नाही. यामुळे विक्रीसाठी आणलेल्या भाजीपाल्याचे नुकसान झाल्याचा आरोप करून शेतकऱ्यांनी जैन धर्मशाळेजवळ पुलावर रास्ता रोको केला.
तहसीलदार चंद्रकांत देवगुणे व पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या आश्वासनानंतर व्यवहार सुरू झाले. देवगुणे यांनी बाजार समितीमध्ये शेतकरी, व्यापारी व अडते यांची बैठक शुक्रवारी (दि. १८) बोलावून सर्वांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
येथे पाच आडते असून, दररोज ५० हजारांपेक्षा अधिक उलाढाल होत असते. शेतकरी वर्गाकडून शून्य टक्के आडत व व्यापारी वर्गाकडून सात टक्के आडत घेण्याचा नियम असतानाही मनमानी करून अधिक रकमेची आडत घेतली जाते असा आक्षेप आहे. तसेच आडते व बाजार समिती यांच्यात पावती फाडण्यावरून वाद आहेत.
दरम्यान, गेले आठ दिवस ५०० व १००० रुपयांच्या नोटांच्या वादावरून बंद असलेली बाजार समिती आज व्यापारी, शेतकरी व संचालक यांच्या बैठकीनंतर सुरू करण्याचे निश्चित झाले.
खरेदीची रक्कम शंभर टक्के चेकने द्यावयाची, रोखीने व्यवहार करायचा नाही. चेक जर वटला नाही तर त्याच दिवशी धनादेशाची रक्कम रोखीने अदा करायची. असे न करणाऱ्या व्यापाऱ्याचा परवाना बाजार समिती रद्द करेल.
ज्या व्यापाऱ्याकडे धनादेश नसेल त्याला लिलावात भाग घेता येणार नाही. शेतकऱ्याने लिलावात माल आणताना पासबुकची झेरॉक्स घेऊनच यायची जेणेकरून चेकवर अचूक नाव लिहिले जाईल.
बैठकीस सभापती तेज कवडे, उपसभापती भाऊसाहेब सदगीर, भाऊसाहेब काकळीज, दिवटे, राजेंद्र देशमुख, व्यापारी सचिन पारख, संजय करवा, सोमनाथ घोंगाणे, समीर कासलीवाल, वाल्मीक गायके, चंद्रकांत फोफलिया, आनंद चोरडिया, सचिन फोफलिया, गोकुळ खैरनार उपस्थित होते.
मध्यंतरीच्या काळात शेतकऱ्यांकडून ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटांच्या बदल्यात जास्तीचा भाव देण्याचे आमिष दाखवून खरेदी करण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात येत होता. तसेच बाजार समिती बंद असण्याच्या कालावधीत अशा प्रकारे खरेदी केल्याचे समजते. सर्व रकमा धनादेशाने अदा करावयाच्या निर्णयामुळे सदर प्रकारास आळा बसेल असे समजण्यात येत आहे. (वार्ताहर)

Web Title: Stop the road to Nandagavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.