आसखेड्यात रास्ता रोको
By admin | Published: March 3, 2016 11:07 PM2016-03-03T23:07:35+5:302016-03-03T23:30:43+5:30
आसखेड्यात रास्ता रोको
आसखेडा : औरंगाबाद-अहवा या राज्य महामार्गांतर्गत येणाऱ्या नामपूर ते ब्राह्मणपाडे रस्त्याचे रुंदीकरण व नवीन डांबरीकरणाचे काम त्वरित सुरू करण्यासाठी आसखेडा येथे सरपंच साहेबराव कापडणीस यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
औरंगाबाद-अहवा राज्य महामार्गांतर्गत येणाऱ्या नामपूर ते ताहाराबाद रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून सातत्याने करण्यात येत होती. त्यापैकी ताहाराबाद ते ब्राह्मणपाडे गावापर्यंत रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम गेल्या ३-४ वर्षांपूर्वी झालेले असून रस्ता पूर्णपणे उखडला आहे. ब्राह्मणपाडे ते नामपूरपर्यंत तर अद्याप रुंदीकरणाचे काम झालेलेच नसून हा रस्ता एकेरी आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत अनेक वेळा लेखी-तोंडी तक्रारी करूनही अद्याप त्याची दखल घेतलेली नाही.
एकेरी रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडी व दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. आजपर्यंत अनेक निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. याचे कोणतेही सोयरसुतक अधिकाऱ्यांना नाही. या रस्त्याच्या कामासाठी आसखेडा बसस्थानकाजवळ सकाळी १० वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
घटनास्थळी सटाण्याचे सार्वजनिक बांधकाम उपविभाग सहायक अभियंता पी. एम. राजपूत यांनी भेट देऊन रस्त्याच्या कामास बुधवारपासून सुरुवात झाली असून पावसाळ्यापूर्वी संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण केले जाईल, असे लेखी पत्र दिल्याने आंदोलन मागे घेण्यात
आले.
आंदोलनात उपसरपंच रेखा कापडणीस, ग्रा. पं. सदस्य अनिता कापडणीस, हिरूबाई कापडणीस, अक्काबाई गायकवाड, नथा कापडणीस, सुभाष कापडणीस, संजय कापडणीस, विशाल सोनवणे, भाजपाचे मांगू कापडणीस, दीपक मोरे, संदीप बिरारी, भाऊसाहेब भामरे, संजय सावळा यांच्यासह आनंदपूर, वाघळे, गोराणे, श्रीपुरवडे, राजपूरपांडे व गावातील महिला व पुरुष
उपस्थित होते. (वार्ताहर)बागलाण तालुक्यातील आसखेडा येथे रस्त्याचे रूंदीकरण करावे या मागणीसाठी केलेला ग्रामस्थांनी केलेला रास्ता रोको.