रासबिहारी चौफुलीवर रास्ता रोको
By admin | Published: June 18, 2015 12:22 AM2015-06-18T00:22:34+5:302015-06-18T00:23:16+5:30
प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन : भुजबळ समर्थकांचे आंदोलन
पंचवटी : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात युती सरकारने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ भुजबळ समर्थकांनी बुधवारी दुपारी रासबिहारी चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करून सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.
भुजबळांविरुद्ध सुरू असलेली कारवाई त्वरित थांबवावी, यासाठी आंदोलन करणाऱ्या नगरसेवक समाधान जाधव यांच्यासह भुजबळ समर्थकांना पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दुपारी साडेतीन वाजता रास्ता रोको आंदोलन करून प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी शेकडो भुजबळ समर्थकांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून कारवाई थांबविण्याची मागणी केली.
भुजबळ यांच्याविरुद्ध केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी नगरसेवक समाधान जाधव, अंबादास खैरे, हेमंत शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले.
रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी नगरसेवक जाधव, खैरे यांच्यासह समर्थकांना ताब्यात घेतले होते. या आंदोलन राहुल कुलकर्णी, संदीप शिंदे, भालचंद्र भुजबळ, किरण सोनवणे, हर्षद पटेल, गोपाळ गोसावी, साहील बैरागी, मकरंद निरभवणे, बबलू साबळे आदिंसह कार्यकर्ते सहभागी होते. (वार्ताहर)