छावा संघटनेच्या वतीने रास्ता रोको
By admin | Published: September 8, 2015 11:15 PM2015-09-08T23:15:05+5:302015-09-08T23:15:40+5:30
मनमाड : नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी
मनमाड : नांदगाव तालुक्यात पावसाअभावी निर्माण झालेली गंभीर दुष्काळी परिस्थिती, पिण्याचे पाणी व जनावरांसाठी तीव्र चाराटंचाई याकडे शासनाचे लक्ष वेधून नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा, या मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीने मंगळवारी
(दि. ८) मनमाड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर व राज्य सरचिटणीस राजाभाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली छावाच्या वरद संकुलमधील कार्यालयापासून मोर्चा काढण्यात आला. दुष्काळाकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काही तालुक्यात रोजगार उपलब्ध करून द्यावा, जे लोक जनावरे सांभाळतात त्यांचा समावेश रोजगार हमीत करावा, ग्रामीण भागातून शाळा-महाविद्यालयांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पास द्यावे, या मागण्यांचे निवेदन तहसीलदार पूनम दंडिले व पोलीस निरीक्षक भागवत सोनवणे यांना देण्यात आले. दुष्काळाकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाचा विलास पांगारकर व राजाभाऊ पवार यांनी भाषणातून समाचार घेतला. असंख्य आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. यावेळी छावाचे जिल्हाध्यक्ष संजय नाठे, तालुकाध्यक्ष सुधाकर पवार, दिनकर काळे, मनमाड शहर कार्याध्यक्ष देवराम सदगीर, रवि भारद्वाज, सुभाष लभडे, समीर पठाण, राजू पठाण, लकी चव्हाण, साहेबराव खताळ, बापू जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)