रस्त्यावर चाऱ्या खोदून वाळू चोरीला पायबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2022 12:13 AM2022-01-25T00:13:44+5:302022-01-25T00:14:19+5:30
देवळा : गिरणा नदीपात्रातून होणारी वाळूची चोरी रोखण्यासाठी सोमवारी (दि.२४) तहसीलदार विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार नदीपात्रालगत असणाऱ्या रस्त्यावर चाऱ्या खोदून वाळू चोरीला पायबंद घालण्यात आला. महसूल विभागाच्या या निर्णयामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले असून, परिसरातील शेतकऱ्यांनी महसूल विभागाच्या या धडक कारवाईचे स्वागत केले आहे.

तालुक्यातील विठेवाडी, लोहोणेर आदी गावांत गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची तक्रार विठेवाडी येथील नागरिकांनी तहसीलदार विजय सूर्यवंशी त्यांच्याकडे केली होती. महसूल विभागाने कारवाई करण्याचे आश्वासन दिले व तातडीने कारवाई करून नदीपात्रातून वाळूची चोरी केली जाते, त्याठिकाणी जाण्याच्या मार्गावरील रस्त्यावर जेसीबीच्या सहाय्याने चाऱ्या खोदण्यात आल्या. यापूर्वी देखील महसूल विभागाने अवैध वाळूउपसा रोखण्यासाठी अनेक वेळा कारवाई केली होती, परंतु ती औटघटकेची ठरल्यामुळे नागरिकांची निराशा झाली होती. या वेळची कारवाई तात्पुरती न ठरता दीर्घकालीन राहील व महसूल विभाग सातत्याने त्याचा पाठपुरावा करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
इन्फो
तहसीलदारांना भेटले शिष्टमंडळ
अनेक दिवसांपासून गिरणा नदीपात्रातून रात्रीच्या सुमारास अवैधरित्या वाळू उपसा केला जात आहे. याची तक्रार करून देखील महसूल व पोलीस यंत्रणा याकडे दुर्लक्ष करीत असल्याची खंत विठेवाडी येथील ग्रामस्थांनी केली होती. सोमवारी गावातील शिष्टमंडळाने तहसीलदार सूर्यवंशी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन यावर पायबंद घालण्याची मागणी केली होती. याची दखल घेऊन तहसीलदारांनी नदीपात्रातून वाळू वाहतूक होणाऱ्या रस्त्यावर चाऱ्या खोदण्याची कारवाई केली.