करवाढीला अखेर स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 01:38 AM2018-04-24T01:38:44+5:302018-04-24T01:38:44+5:30
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील इंच न् इंच जमिनीवर करवाढ लागू करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाचे तीव्र पडसाद सोमवारी झालेल्या विशेष महासभेत उमटले. पालिका मुख्यालयाबाहेर सर्व पक्षांसह नागरिकांकडून आंदोलन होत असतानाच सभागृहातही सदस्यांनी करवाढीला विरोध दर्शविला. यावेळी महापौरांनी करवाढीला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर केला. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महासभा आणि स्थायी समितीचे अधिकार डावलून मोकळे भूखंड आणि पिवळ्या पट्ट्यातील शेतजमिनीवर अव्वाच्या सव्वा कर लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर गेल्या तीन आठवड्यांपासून शहरात ठिकठिकाणी असंतोष प्रकट होत आहे. या निर्णयाच्या विरोधात सोमवारी अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने महापालिका मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधीही सहभागी झाले होते.
महासभेत नऊ तास वादळी चर्चा
आयुक्तांनी स्थायी समिती व महासभेला डावलून एकतर्फी करवाढीचा निर्णय घेतल्याने विशेष महासभेत त्याचे तीव्र पडसाद उमटले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्तांच्या या निर्णयाचा तिखट शब्दांत समाचार घेतला. यावेळी आयुक्तांवर मनमानी कारभाराचा व हिटलरशाहीचाही आरोप करण्यात आला. सुमारे ९ तास चाललेल्या या महासभेत आयुक्तविरोधी सूर उमटला.
आयुक्त अडचणीत येण्याची शक्यता
प्रभाग क्रमांक १३ ची पोटनिवडणूक सुरू असताना करवाढीचा अध्यादेश जारी केल्याने आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप सदस्यांनी केला. यावेळी माजी आयुक्त संजय खंदारे यांची आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी बदली झाल्याचे स्मरणही करून देण्यात आले. त्याप्रमाणेच मुंढे यांची तक्रार आयोगाकडे करण्याची मागणी झाल्याने आयुक्त अडचणीत येण्याची शक्यता आहे.