उमराणेत ग्रामस्थांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:40 AM2019-08-18T00:40:20+5:302019-08-18T00:41:05+5:30
उमराणे : येथील राष्ट्रीय महामार्गवरील बस थांब्यावर नाशिकसह सर्व विभागाच्या बसेसला थांबा असतानाही परिवहन मंडळाच्या काही चालक व वाहक यांच्या हाराकिरीमुळे बस थांबत नसतानाच शनिवारी सकाळी शालेय विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी जळगाव-नाशिक जाणारी बस थांबविण्याचा प्रयत्न केला असता बस थांबल्यानंतर चालक व वाहक यांच्या अरेरावीमुळे शाब्दिक चकमक होऊन तब्बल दोन तास बस रोको आंदोलन छेडण्यात आले.
उमराणे : येथील राष्ट्रीय महामार्गवरील बस थांब्यावर नाशिकसह सर्व विभागाच्या बसेसला थांबा असतानाही परिवहन मंडळाच्या काही चालक व वाहक यांच्या हाराकिरीमुळे बस थांबत नसतानाच शनिवारी सकाळी शालेय विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी जळगाव-नाशिक जाणारी बस थांबविण्याचा प्रयत्न केला असता बस थांबल्यानंतर चालक व वाहक यांच्या अरेरावीमुळे शाब्दिक चकमक होऊन तब्बल दोन तास बस रोको आंदोलन छेडण्यात आले.
जोपर्यंत सदर चालक व वाहकावर कार्यवाही होत नाही तोपर्यंत बस रोको आंदोलन छेडण्याचा पवित्रा घेतलेल्या नागरिकांना देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खंडेराव रंजवे यांनी पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर बस रोको आंदोलन मागे घेण्यात आले. शालेय विद्यार्थिनींसह नागरिकांनी अचानक बस रोको आंदोलन केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे मनमाड येथील दंगा नियंत्रण कक्षाच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते.
१८ ते २० हजार लोकसंख्या असलेले उमराणे गाव हे परिसरातील आठ ते दहा खेड्यांचा दळणवळणाचा केंद्रबिंदू असून, कांद्याची बाजारपेठ, बॅँका, शाळा, कॉलेज, ग्रामीण रु ग्णालय आहे. शिवाय हे गाव राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने येथून परिसरातील शालेय विद्यार्थ्यांसह बहुतांशी नागरिकांना धुळे, मालेगाव, चांदवड, नाशिक आदी ठिकाणी दैनंदिन प्रवास करावा लागतो. उमराणे येथे जळगाव, चाळीसगाव, एरंडोल, अमळनेर, चोपडा, जामनेर, भुसावळ आदी आगाराच्या गाड्यांना थांबा आहे; परंतु बस रिकाम्या असतानाही थांबा नसल्याचे कारण दाखवत बहुतांश चालक व वाहकांच्या मनमानी कारभारामुळे परिवहन मंडळाच्या गाड्या येथे थांबत नसल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांची कुचंबणा होते.
इतरांना त्रास नको म्हणून परिवहन मंडळाच्या बसेस वगळता रहदारी मोकळी करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खंडेराव रंजवे फौजफाटा घेऊन आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; परंतु विद्यार्थिनी व ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत चालक व वाहक यांनी माफी मागितल्यास बस रोको आंदोलन मागे घेण्याची अट टाकली; परंतु चालक व वाहकांनीही माफी न मागितल्याने आंदोलन अधिकच चिघळले होते. शेवटी चालक व वाहक यांना देवळा पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून, उमराणे ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात येणार होता.
दोन तास चाललेल्या बस आंदोलनावेळी ग्रामस्थांच्या वतीने रु ग्णांना रु ग्णवाहिकेचीही व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र देवरे, जाणता राजाचे अध्यक्ष नंदन देवरे, ग्रा.पं. सदस्य सचिन देवरे, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष देवरे, शिवसेनेचे भरत देवरे, दीपक देवरे, उमेश देवरे, नितीन देवरे, अविनाश देवरे, भगवान देवरे आदींसह शेकडो ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी उपस्थित होते. बस थांबली नसल्याने आंदोलनामुळे शालेय विद्यार्थ्यांची शाळा बुडाली. दोन तास चाललेल्या बस आंदोलनात रस्त्याच्या दुतर्फा लांबच लांब रांगा. आंदोलन लांबल्याने मनमाड येथील दंगा नियंत्रण कक्षाचे जवान दाखल. पोलिसांचा चोख बंदोबस्त. बस थांबविण्यासाठी कायम निरीक्षक नेमण्याची मागणी.बसेस थांबवाव्यात याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून परिवहन मंडळाकडे लेखी निवेदने देण्यात आली होती; मात्र परिवहन मंडळाकडून या निवेदनांना आतापर्यंत केराची टोपली दाखविण्यात येत असल्याने उमराणे येथील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना नेहमी रास्ता रोको आंदोलन छेडण्याच्या प्रसंगाला सामोरे जावे लागते. त्याचाच प्रत्यय शनिवारी सकाळी आला असून, चांदवड येथे कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थिनींनी जळगाव आगाराची बस थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालक व वाहक यांनी त्यांच्याशी अर्वाच्य भाषा वापरली. त्यानंतर गावातील बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे, सरपंच बाळासाहेब देवरे,पंचायत समिती सदस्य धर्मा देवरे व इतर नागरिकांनी जाब विचारला असता त्यांनाही अर्वाच्य भाषेत उत्तरे दिल्याने शाब्दिक चकमक होऊन त्याचे रूपांतर रास्ता रोको आंदोलनात झाले.