मनपाच्या बससेवेला आता ‘थांब्यां’चाही थांबा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:14 AM2021-01-22T04:14:26+5:302021-01-22T04:14:26+5:30
नाशिक महानगर परिवहन महांमडळाची बस सेवा येत्या प्रजासत्ताक दिनी सुरू करण्यासाठी महापालिकेने चंग बांधला होता. त्यासाठी मनपाच्या महामंडळानेदेखील जेारदार ...
नाशिक महानगर परिवहन महांमडळाची बस सेवा येत्या प्रजासत्ताक दिनी सुरू करण्यासाठी महापालिकेने चंग बांधला होता. त्यासाठी मनपाच्या महामंडळानेदेखील जेारदार तयारी सुरू केली होती. पहिल्या टप्प्यात ५० डिझेल बस सुरू करण्याचे नियोजन होते. पंचवटी आणि नाशिकरोड येथून एकूण नऊ मार्गांवर ही सेवा सुरू होणार होती. त्यामुळे महापालिकेने आवश्यक त्या सॉफ्टवेअरची चाचणी सुरू केली होती. बस रस्त्यावर आणून त्याचीदेखील सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पडताळणी करण्यात येत होती. मात्र, बस ऑपरेशनसाठी राज्य शासनाच्या परिवहन विभागाचा आवश्यक असणारा परवानाच अद्याप मिळालेला नाही. तो मिळाल्यानंतरदेखील महापालिकेला आरटीएकडून तिकिटांना मंजुरी घ्यावी लागणार आहे. साहजिकच बस सेवेचा मुहूर्त पुढे ढकलला गेला आहे. परंतु आता बस थांब्याच्या ठेकेदारानेही माघार घेतली आहे.
महापालिकेने बस सेवेचा खर्च कमी करण्यासाठी पीपीपीच्या माध्यमातून ७६२ बस थांबे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेला कोणत्याही प्रकारे आर्थिक तोशीस न लागता ठेकेदार बस थांबे उभे करेल आणि त्यावरील जाहिरातींच्या माध्यमातून ठेकेदारास उत्पन्न मिळेल. त्यातील ६५ लाख रुपये दरवर्षी ही ठेकेदार कंपनी महापालिकेस देणार होती. परंतु कोरोना काळामुळे वेळ गेल्याने आता सर्वच बस थांबे वेळेत उभारणे शक्य नसल्याने महापालिकेने मुदतवाढ द्यावी, अशी कंपनीची मागणी होती. आयुक्तांनी त्यास नकार दिल्याने अखेरीस या कंपनीने आता थांब्यांचे कामे करण्यास असमर्थता दर्शविली आहे.
इन्फो..
महापालिकेने ठेकेदार कंपनीला दिलेली वर्षाच्या मुदतीत हे काम शक्य नसल्याने कंपनीने सहा महिने मुदतवाढ मागितली होती. मात्र, ते शक्य नसल्याचे आयुक्त कैलास जाधव यांनी स्पष्ट केले आहे. आता देकार देणाऱ्या दुसऱ्या कंपनीशी महापालिकेने चर्चा सुरू केली आहे.
..........
या बातमीत १२ सीटीलींक हा लोगो वापरावा.