विरोधी पक्षांचे पाणी रोको आंदोलन : रामकुंडात पाण्यात उतरून घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 01:49 AM2018-10-25T01:49:01+5:302018-10-25T01:49:42+5:30
गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयाला सत्ताधारी भाजपा वगळता मनसे, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व माकपा या सर्वपक्षीयांनी एकत्र येत विरोध दर्शवित पाणी सोडण्यास कडाडून विरोध केला आहे. शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाचा विचार न करता परस्पर घेतलेल्या निर्णयाचा निषेध म्हणून सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. २४) दुपारी रामकुंडात पाण्यात उतरून घोषणाबाजी करीत सत्ताधारी भाजपा तसेच शासनाचा निषेध नोंदविला.
पंचवटी : गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयाला सत्ताधारी भाजपा वगळता मनसे, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व माकपा या सर्वपक्षीयांनी एकत्र येत विरोध दर्शवित पाणी सोडण्यास कडाडून विरोध केला आहे. शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाचा विचार न करता परस्पर घेतलेल्या निर्णयाचा निषेध म्हणून सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. २४) दुपारी रामकुंडात पाण्यात उतरून घोषणाबाजी करीत सत्ताधारी भाजपा तसेच शासनाचा निषेध नोंदविला. यावेळी सर्वपक्षीयांनी गोदावरीची महाआरती केली. नाशिकच्या गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने काही दिवसांपूर्वी घेतला. सदरचा निर्णय घेताना नाशिकच्या नागरिकांना पिण्यासाठी लागणाºया पाण्याचा अंदाज घेतलेला नाही तसेच नाशिकच्या जनतेसाठी धरणातून पाणी आरक्षित केलेले नाही.
यावेळी धरण उशाशी कोरड घशाशी, पाणी नाही कुणाच्या बापाचे ते तर आमच्या हक्काचे, नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी अशा घोषणा दिल्या. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, मनसे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. राहुल ढिकले, जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी, मनपा विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, माजी महापौर अशोक मुर्तडक, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शिवसेनेचे महानगरप्रमुख महेश बडवे, विलास शिंदे, माकपचे श्रीधर देशपांडे, गजानन शेलार, शाहू खैरे, राजेंद्र बागुल, पूनम मोगरे, वैशाली भोसले, दिगंबर मोगरे, प्रवीण भाटे, खंडू बोडके आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी नाशिकला येऊन नाशिक दत्तक घेतल्याची घोषणा केली होती. यंदाच्या वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यातच आता जायकवाडीला पाणी देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. नाशिकचे पाणी नाशिकच्या जनतेसाठी असून, हे हक्काचे असल्याने कुणालाही देऊ नये. दत्तक नाशिकला सत्ताधारीच सावत्रपणाची वागणूक देत असल्याने नाशिक दत्तक की सावत्र असा प्रश्न तमाम नाशिककरांना पडला आहे. नाशिकचे पाणी जायकवाडीला सोडल्यास आंदोलन छेडण्यात येईल.
- अॅड. राहुल ढिकले, मनसे प्रदेश उपाध्यक्ष
दुष्काळजन्य परिस्थिती
यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे असे असतानाही जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला गेल्याने सत्ताधारी वगळता सर्वपक्षीयांनी एकत्र येत पाणी सोडण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे.
मनसे, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व माकपा पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रामकुंडावर एकत्र येत पाण्यात उतरून हातात फलक घेत शासनाचा व सत्ताधारी पक्षाचा निषेध नोंदविला.