पाणीप्रश्नी नांदगावी रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 03:58 PM2019-02-01T15:58:44+5:302019-02-01T16:03:41+5:30
सर्वपक्षीय आंदोलन : नवीन पाईपलाईनची मागणी
नांदगाव : नांदगाव शहरास पाणी पुरवठा करणारी माणिकपुंज धरणाची मुख्य जलवाहिनी रस्त्याच्या कामामुळे ठिकठिकाणी वारंवार फुटत असल्याने शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून सदर जलवाहिनी लोखंडी (जीआय) बनवून द्यावी या मागणीसाठी नगराध्यक्ष राजेश कवडे व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा चौकात सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात आला. या संदर्भात तहसीलदार भारती सागरे यांना निवेदन देण्यात आले.
नांदगाव शहराला काही प्रमाणात माणिकपुंज धरणातून आठ ते दहा दिवसांनी पाणी पुरवठा होत असतो. सदरची जलवाहिनी नांदगाव औरंगाबाद रस्त्याला समांतर आहे. अलीकडेच हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून जाहीर झाला आहे. या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गाचे मजबुतीकरण व रु दीकरणाचे काम सुरु असल्याने खोदकाम करतांना पाईप लाईन अनेक ठिकाणी वारंवार फुटत आहे. त्यामुळे पाण्याचे आवर्तन लांबणीवर पडून शहरातील नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संबंधित पाईप लाईन तातडीने बदलवून द्यावी,अशी आग्रही मागणी नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी रास्ता रोको प्रसंगी व्यक्त केली. अॅड. सचिन साळवे यांनी संबंधितांनी लोखंडी पाईप लाईन बनवून देण्याचे आश्वासन पाळले नसल्याचे सांगितले. शहराला होणारा पाणी पुरवठा लांबणीवर पडत असल्याने अभूतपूर्व पाणी टंचाई निर्माण झाली आहे. रस्त्यांवर सर्वत्र पाण्याचे टॅँकर दिसू लागले असून त्यांचेही दर वाढले आहेत. त्याची झळ नागरिकांना पोहोचत आहे. दरम्यान, रास्ता रोकोमुळे औरंगाबाद मालेगाव येवला भागाकडे जाणाऱ्या राज्यमार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.