निफाडसह विविध गावांत रास्ता रोको
By admin | Published: June 6, 2017 02:10 AM2017-06-06T02:10:50+5:302017-06-06T02:10:59+5:30
निफाड : तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकीचे बळ दाखवल्यामुळे सर्वच गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
निफाड : तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकीचे बळ दाखवल्यामुळे सर्वच गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. हा बंद यशस्वी झाला तर काही गावामध्ये रास्ता रोको, सरकारची प्रतीकात्मक प्रतिमा जाळणे, भाजीपाला रस्त्यावर फेकणे आदी मार्गाने आंदोलन करण्यात आले. निफाड येथे सर्वच पक्षांच्या वतीने निफाड शहरात बंद पाळण्यात आला. निफाडमधील सर्वच व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून या बंदला पाठिंबा दिला. त्यामुळे कुठलेही व्यवहार होऊ शकले नाहीत.
बंदमुळे शहरात दिवसभर शुकशुकाट होता. मेडिकल, दवाखाने, हॉस्पिटल या अत्यावश्यक सेवा चालू होत्या. कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता. दिवसभरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
निफाड येथे शेतकरी आंदोलकांनी सकाळी ११ वाजता येथील शांतीनगर त्रिफुली येथे रास्ता रोको आंदोलन केले. याप्रसंगी बोलताना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिल कुंदे यांनी भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले़ या सरकारने लोकांचा विश्वास गमावला आहे. शेतकरी संपाच्या आंदोलनात पोलिसांनी शेतकऱ्यांवर कांदे, कोंबड्या, अंडे चोरीचे गुन्हे लावले असून, हे गुन्हे पोलिसांनी ताबडतोब मागे घेण्याची मागणी कुंदे यांनी केली. अनिल कुंदे, विक्रम रंधवे, शिवाजी ढेपले, संपत व्यवहारे, योगेश कुंदे आदींचीही भाषणे झाली.
याप्रसंगी रमेश जेऊघाले, नगरसेवक देवदत्त कापसे, संदीप जेऊघाले, विनोद जोशी, सुरेश कापसे, बापू कुंदे, संजय धारराव, दीपक गाजरे, मोहन जाधव आदींसह असंख्य शेतकरी उपस्थित होते़