शेतमजूर महिलांचा प्रकाशा मार्गावर रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 01:43 AM2018-11-25T01:43:34+5:302018-11-25T01:44:00+5:30
येथील विंचूर-प्रकाशा महामार्गावर पोलिसांनी गाडी अडवली म्हणून शेतमजूर महिलांनी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ठिय्या आंदोलन सुरू केल्याने वाहतूक खोळंबली होती. शहरातील नागरिकांनी पोलीस व महिलांची समजूत घातल्याने सुमारे अर्धा तासानंतर वाहतूक सुरळीत झाली.
देवळा : येथील विंचूर-प्रकाशा महामार्गावर पोलिसांनी गाडी अडवली म्हणून शेतमजूर महिलांनी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ठिय्या आंदोलन सुरू केल्याने वाहतूक खोळंबली होती. शहरातील नागरिकांनी पोलीस व महिलांची समजूत घातल्याने सुमारे अर्धा तासानंतर वाहतूक सुरळीत झाली. देवळा तालुक्याचा पूर्व भाग तसेच मालेगाव, चांदवड आदी तालुक्यांतील शेकडो शेतमजूर दुष्काळामुळे देवळा तालुक्याच्या पश्चिम भागात दररोज रोजगारासाठी पीकअप, रिक्षा आदी खासगी वाहनांतून येतात. दिवसभराचे काम आटोपून सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास घरी परतत असताना देवळा शहरातील विंचूर-प्रकाशा महामार्गावर मालेगाव नाक्यावर देवळा वाहतूक पोलिसांनी त्यांची गाडी अडवून कागदपत्रांची मागणी केली व अवैध प्रवासी वाहतूक केल्याबद्दल चालकावर दंडात्मक कारवाई केली. त्यावेळी गाडीतील मजूर महिलांनी आम्हाला घरी लवकर जाऊ द्या, अशी विनंती केली. वाहनातून अनधिकृत प्रवासी वाहतूक केली म्हणून दंड भरल्याशिवाय गाडी सोडणार नाही अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याने संतप्त महिलांनी रस्त्यातच ठिय्या दिला. यामुळे तणाव निर्माण झाला होता. शहरातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते. वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी होऊन वाहनधारकांची व पोलिसांची धावपळ उडाली. दरम्यान, मजुरांची वाहतूक करणाऱ्या इतर वाहनचालकांना पोलीस दंडात्मक कारवाई करत असल्याची माहिती मिळताच त्यांनी आपल्या गाडीतील मजुरांना कळवण नाक्यावर उतरवून दिले व मालेगाव नाक्याच्या पुढे शहराबाहेर पायी जाण्यास सांगितले. यामुळे शहरातून मजुरांचे जत्थे जात असल्याचे चित्र होते.
यावेळी देवळा बाजार समितीचे माजी सभापती अशोक अहेर, संतोष शिंदे, सुनील अहेर आदींसह शेतकºयांनी पोलिसांच्या या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केली व पोलिसांना सामंजस्याची भूमिका घेण्याची विनंती केली. पोलिसांनी समझदारी दाखवल्याने कटू प्रसंग टळला व अर्धा तास ठप्प झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली.
सध्या दुष्काळी स्थिती निर्माण झाली असल्याने शेजारील तालुक्यातील आदिवासी महिला रोजगारासाठी विविध वाहनांनी देवळा तालुक्यात येतात. त्यांना त्रास देऊ नये अशी विनंती नागरिकांनी पोलीस प्रशासनाला केली आहे.